जोशी-शिंदेंमध्ये पुन्हा चुरस

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत एकमत होत नसल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार मोहन जोशी आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे यांच्यात उमेदवारीसाठी पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, बहुजन उमेदवार असावा या आग्रहामुळे शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा पक्षात असून मोहन जोशी यांचेही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे यांची नावे निश्चित केली होती. त्यानंतर खासदार संजय काकडे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांचीही नावे चर्चेत आली. मात्र ती नावे मागे पडल्यानंतर मोहन जोशी आणि शिंदे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात होते. जोशी यांच्या नावासाठी

महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आग्रही असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. नावांवर एकमत होत नसल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. उमेदवाराचे नाव निश्चित होत नसल्यामुळे पक्षाच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी केली. त्यामुळे मंगळवारी चव्हाण यांनाच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र चव्हाण यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी रात्री पुन्हा शिंदे की जोशी अशी चर्चा सुरू झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही पुण्यातून लढण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. मात्र त्यांनीही नकार दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही. कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविणार नाही.

– पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते, काँग्रेस</strong>