पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही; मग ते नितीशकुमार असतील किंवा अन्य कोणी, अशी टिप्पणी करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शनिवारी टोला लगावला.
भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वात विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे मत पवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता चव्हाण म्हणाले,‘‘ मोदी सरकारच्या कामामुळे लोक त्रस्त आहेत. दिल्ली, बिहार आणि महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या निवडणुकांमध्ये ते दिसून आले. मात्र, या देशात काँग्रेस आणि भाजप या दोन मोठय़ा पक्षांना बाजूला ठेवून राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळेच मोदी आणि भाजपविरोधी आघाडी करताना काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय होऊ शकत नाही.’’
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकारला पूर्णपणे अपयश आले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राज्य दुष्काळमुक्त करू असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे कोणती जादूची कांडी आहे माहीत नाही, असा टोला लगावत ‘अशाने राज्यात उद्योग येतील का?’, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या चव्हाण यांनी आदर्श प्रकरणाबाबत बोलणार नसल्याचे सांगितले.
गेल्यावर्षी पावसाळा संपल्याचे समजताच नियोजन करायला हवे होते. पण, राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला याची जाहिरात केली जाते हे काय भूषणावह आहे का, असा प्रश्न उपस्थित करून चव्हाण म्हणाले,‘‘शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडवून ‘आयपीएल’चे सामने रद्द केले. या प्रकरणात सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही. बिअर उद्योगाचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पाणी द्यावे लागते म्हणून विरोध केला गेला की सरकार मद्यनिर्मितीच्या विरोधात आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पाणी आणि जमीन याच्या जोरावरच राज्यामध्ये उद्योग वाढतात. मग, या दोन्ही गोष्टींना नाही म्हणून सरकारला राज्याला प्रगतिपथावर न्यायचे आहे की राज्यामध्ये औद्योगिकीकरण होऊ नये यासाठीचे डावपेच आहेत हे सरकारने आधी स्पष्ट करावे.’’
स्वस्त घराच्या भूलभुलैय्या प्रकरणामध्ये सरकारमधील उच्चपदस्थांच्या भूमिकेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मॅपल ग्रुपच्या सचिन आगरवाल याला अटक का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून दोषींना बेडय़ा ठोकल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. घरे देण्यामध्ये सरकार अपयशी ठरते तेव्हा असे लोक पुढे येताना दिसतात, असेही ते म्हणाले.

वेगळा केल्याने विदर्भाचा
विकास होणार आहे का?
अॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत चव्हाण यांनी ‘स्वतंत्र होऊन विदर्भ आणि मराठवाडय़ाची परिस्थिती चांगली होणार आहे का’ असा सवाल केला. स्वतंत्र झाल्याने तेथील विकास होणार आहे का आणि दरडोई उत्पन्नामध्ये भर पडणार आहे का, हे आधी समजावून दिले पाहिजे. उगाच कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून स्वतंत्र होण्याची मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.