टोल नाक्यांच्या रांगेत थांबल्याने वाया जाणारा वेळ व इंधन वाचविण्यासाठी एकरकमी टोल भरण्याबाबत वाहतूकदारांनी दिलेल्या पर्यायावर शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने मालवाहतूकदारांनी गुरुवारपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू केले. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात शुक्रवारी मध्यरात्रीपासून खासगी बस वाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य बाबा शिंदे यांनी दिली.
टोल नाक्याच्या रांगेमध्ये थांबल्याने वेळ वाया जाण्याबरोबरच वर्षभरात ८८ कोटी रुपयांच्या डिझेलची नासाडी होते. त्यामुळे संघटनेच्या देशभरातील ८० लाख सभासदांकडून टोलची वार्षिक १४ हजार कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा पर्याय शासनापुढे ठेवण्यात आला होता. वर्षभरात वेगवेगळ्या बैठका झाल्या, मात्र शासनाने त्याला प्रतिसाद दिला नाही. बुधवारी संध्याकाळी नितीन गडकरी यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यातही काही तोडगा न निघाल्याने गुरुवारी सकाळी सहापासून बंद सुरू करण्यात आला.
मालवाहतूकदारांनी ट्रक, टेम्पो, ट्रेलर आदी वाहने बंद ठेवली आहेत. पुण्यामध्ये गुरुवारी वाहतूकदारांनी निदर्शने केली. आरटीओ कार्यालयाजवळ गुरुवारी ही निदर्शने करण्यात आली. पुढील तीन दिवस शहरातील व जिल्ह्य़ात विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आहे. खासगी प्रवासी वाहतुकीतील वाहतूकदारही बंदमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यामुळे टोलचा संबंध येणाऱ्या खासगी प्रवासी बस शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडकर, उपाध्यक्ष राजेंद्र जुनावणे, पुणे चालक मालक संघाचे प्रकाश जगताप, विक्रांत इगरुळकर, दादा कुंभार आदी त्या वेळी उपस्थित होते.