पुणे : करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा विचार न करता, पालकांना विश्वासात न घेता शुल्क भरण्याची सक्ती खासगी शाळांकडून करण्यात येत आहे. या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागली. त्यामुळे जवळपास दोन महिने उद्योग-व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे पालकांसमोर आर्थिक अडचणी आहेत. त्यातच १५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्यानंतर शाळांकडून शुल्क भरण्यासाठी सक्ती करण्यात येऊ लागली आहे. राज्य शासनाने शुल्क सक्ती न करण्याच्या दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रस्ता, लष्कर अशा विविध भागांतील नामांकित संस्थांच्या शाळांकडून शुल्क भरण्याच्या सूचना पालकांना देण्यात येत आहेत.

‘गेल्या वर्षीच्या भरलेल्या शुल्कातील खर्च न झालेली रक्कम शाळेने वापरावी. ऑनलाइन शाळेसाठी आधीच पालकांना खर्च करावा लागत आहे. ऑनलाइन शाळा नेहमीच्या शाळेइतका वेळ चालत नाही. शाळेने शुल्क भरण्यासाठी थेट चार चलने पाठवली आहेत. सध्याच्या आर्थिक अडचणींच्या काळात शुल्कासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. यंदा शाळेतील बाकी सुविधा वापर होणार नसल्याने शाळेने अनावश्यक खर्च टाळून शुल्काच्या रकमेत सवलत द्यावी. शाळा सुरू झाल्यावर राहिलेले शुल्क

घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे शाळेने पालकांना विश्वासात घेऊन नियोजन करावे,’ असे काही पालकांनी सांगितले.

शिक्षण विभागाने तक्रारींची दखल घ्यावी

शासनाने शुल्काची सक्ती न करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. शाळांकडून शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येत असल्याबाबत तक्रार केली, तरी शिक्षण विभागाकडून त्याची दखल घेतली जात नाही, असेही पालकांचे म्हणणे आहे.