सार्वजनिक व्यवस्थेचा फज्जा; सणाला ९४७८ दुचाकी, ३४७१ मोटारी रस्त्यावर

पीएमपीसारख्या सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने शहरांतर्गत प्रवासासाठी पुणे शहरामध्ये वैयक्तिक वाहनांच्या खरेदीची गरज दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. यंदाच्या दसऱ्याला मागील वर्षांच्या तुलनेत वाहन खरेदीची संख्या काहीशी घटली असताना वाहतुकीच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळाला असतानाच दिवाळीच्या दिवसात पुन्हा विक्रमी वाहन खरेदी झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिवाळीतील दिवसांचा मुहूर्त साधून शहरात तब्बल १४,१८४ नव्या वाहनांची खरेदी झाली आहे. त्यात ९४७८ दुचाकी, तर ३४७१ मोटारींचा समावेश आहे.

पुणे शहरामध्ये मागील काही वर्षांपासून नव्या वैयक्तिक वाहनांच्या खरेदीचा वेग प्रचंड वाढला आहे. दुचाकी वाहनांची एक हजार क्रमांकाची मालिका अवघ्या पंधरा दिवसांत संपते, तर मोटारींची हजार क्रमांकाची मालिका महिनाभरात पूर्ण होते. म्हणजेच शहरात पंधरा दिवसांत एक हजार नव्या दुचाकी आणि महिनाभरात हजार मोटारी दाखल होत आहे. दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यात दरवर्षी पंधरा ते वीस हजार वाहनांची भर पडते. सद्य:स्थितीत शहरामध्ये लोकसंख्येपेक्षाही अधिक वाहनसंख्या झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडते आहे. मोठय़ा प्रमाणावर वाहने रस्त्यावर येत असल्याने प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

शहरातील वैयक्तिक वापराच्या वाहनांच्या वाढीला कारणीभूत असलेला सर्वात मोठा घटक शहरांतर्गत सार्वजनिक प्रवासी वाहतूक आहे. पीएमपीच्या बस सेवेचा बोजवारा उडाला आहे. पुरेशा बस उपलब्ध नाहीत. असलेल्या बस योग्य मार्गावर आणि योग्य स्थितीत नाहीत. रस्त्यात कधी बस बंद पडेल याचा भरोसा नाही. अशा सर्व स्थितीमुळे शहरांतर्गत प्रवासासाठी वैयक्तित वाहने घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचीच प्रचिती यंदाच्या दिवाळीत दिसून आली असून, मोठय़ा प्रमाणावर वाहने खरेदी झाल्याने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे पितळ उघडे झाले आहे.

मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ८,६९८ नवी वाहने रस्त्यावर आली होती. त्याच वर्षी दिवाळीत दसऱ्याचा विक्रम मोडीत निघाला. २०१७ मध्ये दिवाळीच्या दिवसांत १० हजार ८०० नवी वाहने रस्त्यावर आली. यंदा दसऱ्याला केवळ पाच हजार नवी वैयक्तिक वाहनांची खरेदी झाली होती. त्यामुळे वाहन खरेदीला उतरण लागल्याचे चित्र असतानाच दिवाळीच्या दिवसांत झालेल्या खरेदीने हा समज फोल ठरविला. यंदा दिवाळीत एकूण १४ हजार १८४ नवी वाहने रस्त्यावर आली. त्यात वैयक्तिक वाहनांची संख्या १३ हजार ९४९ आहे.

दुचाकीसह मोटारींची खरेदी वाढली

पुण्यात राज्याच्या कोणत्याही शहराच्या तुलनेत वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. वैयक्तिक वाहनांमध्ये दुचाकींची संख्या विक्रमी आहे. पाच वर्षांच्या एकत्रित विम्यामुळे दुचाकीच्या किमती सहा ते सात हजारांनी वाढल्या आहेत. तरीही दुचाकीच्या संख्येत दररोजच भर पडते आहे. यंदा दिवाळीला नऊ हजारांहून अधिक नव्या दुचाकी दाखल झाल्या. दुचाकीसह सध्या मोटारी खरेदी करण्याचे प्रमाणही पुण्यात वाढले असल्याचे यंदाच्या दिवाळी खरेदीतून दिसून आले. दसऱ्यामध्ये मागील वर्षांच्या तुलनेत मोटारींच्या खरेदीत ६७ टक्के घट नोंदविण्यात आली होती. मात्र, दिवाळीला ही कसर भरून निघाली. मागील दिवाळीला ११८५ मोटारींची खरेदी झाली होती. यंदा त्यात जवळपास तिपटीने वाढ झाली असून, दिवाळीच्या मुहूर्तावर शहरातील रस्त्यांवर तब्बल ३४७१ नव्या मोटारी दाखल झाल्या.