– डिसेंबरमधील अगाऊ आरक्षणाला वाहतूकदारांचा नकार
– मागणीच्या काळामध्ये जास्त दर लावण्यासाठी शक्कल
 
खासगी प्रवासी बसच्या भाडय़ाबाबत कोणतेही र्निबध नसल्याचा फटका प्रत्येक वेळी प्रवाशांना सहन करावा लागत असून, त्यातून प्रवाशांची लूटमार होत असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. उन्हाळी व दिवाळी सुटय़ांमध्ये ही बाब प्रामुख्याने उघडकीस येत असते, मात्र डिसेंबरमध्ये अनेक जण सहलीच्या निमित्ताने विविध ठिकाणी जात असतात. हीच बाब लक्षात घेऊन डिसेंबरमध्ये वाढणारी मागणी व त्यानुसार वाढणारे प्रवासी भाडे डोळ्यासमोर ठेवून या कालावधीतील खासगी बसचे बुकिंग बहुतांश प्रवासी वाहतूकदारांकडून थांबविण्यात आले आहे.
उन्हाळ्यांच्या त्याचप्रमाणे दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये प्रामुख्याने मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असते. या काळातही खासगी बसच्या भाडय़ांमध्ये प्रचंड वाढ केली जाते. या काळात एसटीकडूनही जादा गाडय़ा सोडण्यात येतात. त्यामुळे काही प्रमाणात एसटीच्या गाडय़ांचा आधार प्रवाशांना असतो. यंदा दिवाळीच्या सुटीमध्ये एसटीने मोठय़ा प्रमाणावर जादा गाडय़ा सोडल्या होत्या. त्याचप्रमाणे वातानुकूलित शिवनेरी गाडय़ा सोडण्यावरही भर दिला होता. त्याचा परिणाम म्हणून खासगी बसच्या भाडय़ावर काही प्रमाणात र्निबध येऊ शकले.
डिसेंबरमध्ये १५ ते २५ या दहा दिवसांच्या कालावधीत त्याचप्रमाणे २५ डिसेंबरनंतर ३१ डिसेंबपर्यंत प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. या काळात विविध भागांत सहलीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. एसटीकडून या कालावधीत जादा गाडय़ा नसतात. हीच संधी साधून या काळात प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केले जाते. गोवा, नागपूर या मार्गाला मोठी मागणी असते. सध्या डिसेंबरमधील गाडय़ांचे बुकिंग घेण्यासाठी गेल्यास बहुतांश खासगी वाहतूकदारांकडून हे बुकिंग आता मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप या काळातील भाडे निश्चित झाले नसल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे मागणीच्या वेळी भाडे वाढविले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे ते गोवा या एकाच मार्गाचे उदाहारण घेतल्यास स्लीपर कोचसाठी सध्या बाराशे ते पंधराशे रुपये भाडे आहे. मागणीच्या काळामध्ये हे भाडे काही वाहतूकदार थेट तीन ते साडेतीन हजार रुपये करतात. हे जास्त भाडे घेण्यासाठीच सध्या डिसेंबरचे बुकिंग अनेकांनी बंद केले असल्याचे दिसून येते आहे.
‘खासगी बसच्या भाडय़ावर र्निबध हवेच’
खासगी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाडय़ा त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेशीरबाबी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासल्या जातात. मात्र, या बसचे ठराविक अंतरावर भाडे किती असावे, याबाबत कोणाचेही नियंत्रण नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन मागणीच्या काळामध्ये मनमानी पद्धतीने भाडय़ाची आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते. ही लूट होत असल्याचे कळत असतानाही केवळ गरज म्हणून खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे या गाडय़ांच्या भाडय़ाबाबतही र्निबध हवे आहेत, असे श्रीनिवास ढावरे या प्रवाशाने सांगितले.
‘व्यवसायासाठी हेच दिवस असतात’
मागणीच्या काळामध्ये खासगी बसच्या भाडय़ामध्ये होत असलेल्या वाढीचे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून समर्थन करण्यात येते. याबाबत खासगी प्रवासी वाहतुकीतील एक कर्मचारी म्हणाला, ‘‘गाडय़ांचा देखरेख व इतर खर्च मोठा असतो. गाडी बंद असो किंवा सुरू असो, शासकीय सर्व प्रकारचे कर भरावे लागतातच. मागणी नसलेल्या काळामध्ये काही वेळेला निम्म्याहून कमी प्रवासी भरून बस पाठविण्यात येते. त्या वेळी तोटा सहन करून सेवा दिली जाते. डिसेंबरचा दर अद्याप निश्चित झालेला नाही, पण व्यवसायासाठी हेच दिवस असतात.’’