काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त परीक्षेचा (आयसीएसई) निकाल बुधवारी जाहीर झाला असून त्यामध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. पुण्यातील सेंट मेरीज स्कूल मधील विद्यार्थिनी प्रिया नायर आणि अॅशले कॅस्टेलिनो या विद्यार्थिनींनी ९८.२ टक्के गुण मिळवून पहिल्या तीन क्रमांकामध्ये देशात स्थान मिळवले आहे.
प्रिया नायर आणि अॅशले कॅस्टेलिनो या विद्यार्थिनी सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकत आहेत. या दोघीना ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी देशातील साधारण ३० विद्यार्थी हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ९९ टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी आयसीएसईच्या परीक्षेचा निकाल ९८.२८ टक्के लागला आहे. देशभरातून या परीक्षेसाठी १ लाख ४९ हजार ८७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७४९ विद्यार्थी हे अक्षम होते. निकालाबाबत शंका असल्यास पुनर्मूल्यांकनाचे अर्ज करण्यासाठी ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यावर्षी पुण्यातील शाळांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे. पुण्यातील बहुतेक शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवलेल्या सेंट मेरीज शाळेचा निकालही शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बिशप्स शाळेच्या उंड्री, कल्याणीनगर, कॅम्प या तिन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्या प्रतिष्ठान शाळेचा निकालही शंभर टक्के लागला असून या शाळेत ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळालेले २० विद्यार्थी आहेत.