बदली खेळाडू आनंद पाटीलने दुसऱ्या सत्रात येऊन केलेल्या चढाईच्या जोरावर दबंग दिल्लीने बंगालविरुद्धच्या सामन्यात बरोबरी साधली. पिछाडी भरुन काढत दबंग दिल्लीच्या संघाने घरच्या मैदानावर बंगाल वॉरियर्सला ३१-३१ अशा बरोबरीत रोखलं. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगाल वॉरियर्सकडे या सामन्यात आघाडी होती, मात्र मोक्याच्या क्षणी त्यांच्या खेळाडूंनी पॉईंट गमावत दिल्लीला बरोबरी साधण्याची संधी दिली. हा सामना जरी बरोबरीत सुटला असला तरीही बंगाल वॉरियर्ससाठी हा निराशाजनक निकाल म्हणावा लागेल.

दबंग दिल्लीच्या बचावफळीने आज सामन्यात पुरती निराशा केली. सुनील कुमारचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला बचावात गुण मिळवता आले नाही. मात्र बचावपटूंची कमतरता दिल्लीच्या चढाईपटूंनी भरुन काढली. रोहीत बालियानने ७ तर कर्णधार मिराज शेखने सामन्यात ५ गुणांची कमाई केली. मात्र संघाला आघाडी मिळवून देण्यात ते अपयशी पडले.

अखेर दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक भेंडीगीर यांनी आनंद पाटीलला संघात जागा दिली. यावेळी आनंदने बंगालच्या बचावफळीला सुरुंग लावत दिल्लीसाठी १-१ गुण मिळवायला सुरुवात केली. दिल्लीच्या सुदैवाने आनंद पाटीलवर अंकुश लावणं बंगालच्या चढाईपटूंना जमलं नाही. त्यामुळे हा सामना अखेर बरोबरीत सुटला. आनंद पाटीलने दिल्लीकडून खेळताना चढाईत सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली.

कालच्या सामन्याप्रमाणे बंगालकडून मणिंदर सिंहने एकाकी झुंज दिली. त्याने सामन्यात सुरुवातीच्या सत्रात चांगला खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र इतर खेळाडूंची त्याला हवी तशी साथ लाभली नाही. याच गोष्टीचा फायदा दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी अखेरच्या सत्रात घेतला. मणिंदरने सामन्यात १३ गुण मिळवले, मात्र त्याच्या साथिदारांना योग्य ती कामगिरी करता आलेली नाही.

बचावफळीत कर्णधार सुरजित सिंह, श्रीकांत तेवतीया, रण सिंह यांनी काही गुणांची कमाई करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या मिनीटात बंगालचे सर्व बचावपटू आनंद पाटीलच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे अखेर हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडत बंगाल वॉरियर्सला बरोबरीवर समाधान मानावं लागलं.