प्रा. मिलिंद जोशी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांवरील प्रमुख कार्यवाहपदाचा शनिवारी राजीनामा दिला. व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे साहित्य संस्थेच्या कामकाजासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण प्रा. जोशी यांनी दिले असले तरी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे आलेल्या उद्विग्नततेतून हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी दुपारी ‘मसाप’च्या कार्याध्यक्षा आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या निवासस्थानी जाऊन आपले राजीनामापत्र दिले. जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याच्या वृत्ताला डॉ. माधवी वैद्य यांनी दुजोरा दिला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच जोशी यांच्या राजीनाम्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये गेली सात वर्षे काम करीत असून कार्यवाह आणि प्रमुख कार्यवाह या नात्याने विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र, आता व्यावसायिक जबाबदारी वाढत आहे. त्यांना वेळ द्यावा लागतोय. त्यासाठी परिषदेला पुरेसा वेळे देता येत नसल्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. परिषदेने मला सन्मान दिला आहे. भविष्यातही परिषदेबाबत आत्मीयता राहील, असे प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या राजीनामापत्रामध्ये नमूद केले आहे.
मात्र, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करूनही प्रा. मिलिंद जोशी यांना त्यामध्ये अपयश आले. त्याचप्रमाणे साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीमध्ये त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी याचे पर्यावसन जोशी यांच्या राजीनाम्यामध्ये झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.