सोसायटय़ांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा सोसायटय़ांमध्येच जिरवण्याचे बंधन महापालिकेने घातले असले, तरी सुका कचरा उचलण्याचे काम महापालिकेने बंद केल्यामुळे सोसायटय़ांपुढे सुका कचऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
कचरा सोसायटय़ांमध्येच जिरवणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर अनेक सोसायटय़ांनी ओला कचरा जिरवण्यासाठी छोटे प्रकल्प सुरू केले आहेत. असे प्रकल्प सोसायटय़ांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सुरू आहेत. मात्र सुका कचरा जिरवण्याचा प्रश्न आता उभा राहिला आहे. कोरडा कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था सध्या महापालिका करत नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सोसायटय़ांमधील सुका कचरा उचलला जात नसल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदारसंघातील सोसायटय़ांच्या बैठका सध्या मी घेत आहे. या बैठकीत सर्व सोसायटय़ांकडून सुक्या कचऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत, अशी तक्रार असल्याचे काळे म्हणाले. सुका कचरा गोळा केला जात नसल्यामुळे तो सोसायटय़ांच्या बाहेर टाकण्याचे किंवा रस्त्यांच्या कडेला टाकण्याचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
सोसायटय़ांमध्ये जमा होणारा सुका कचरा टाकण्यासाठी महापालिका काही जागा निश्चित करून देईल. त्या ठिकाणी सोसायटय़ा सुका कचरा आणून टाकू शकतील. हा कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे केली जाईल, असे या चर्चेत आयुक्तांनी सांगितल्याची माहितीही काळे यांनी दिली.

महापालिकेकडून ठोस कार्यवाही नाही
माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवण्याबाबत मी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. अनेक कामांना राज्य शासनाचा सकारात्मक पाठिंबा आहे. त्यातून कामे मार्गी लागू शकतात. मात्र महापालिका प्रशासन सकारात्मक नाही. विविध विषयांबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नाही असा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.
आमदार विजय काळे