औद्योगिक पट्टय़ात अडचणींची मालिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील उद्योगधंदे सुरू झाले असले, तरी त्याची गती अद्याप मंदच आहे. परगावी गेलेल्या कामगारांमुळे निर्माण झालेली पोकळी उद्योगांना अद्याप भरून काढता आलेली नाही. इतरही अनेक प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. सध्याची परिस्थिती फारशी अनुकूल नसल्याने उद्योगनगरीतील गाडा सुरळीत होण्यास बराच कालावधी जाणार आहे.

राज्यशासनाने उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिल्यानंतर शहरातील लहान, मोठे अनेक उद्योगधंदे सुरू झाले. मात्र, पहिल्या काही दिवसातच अनेक अडथळ्यांना सामोरे जाताना उद्योगांची दमछाक होऊ लागली आहे. कामगारांची गरज म्हणून सुरुवातीला स्थानिक परिसरात राहणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आले. त्यानंतर, इतर भागातील (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) कामगारांना रूजू करून घेण्यात आले. मात्र, तरीही आवश्यक कुशल कामगारांचा तुटवडा सर्वच उद्योगांना भासतो आहे.

त्याचे कारण, टाळेबंदीत हाल होऊ लागल्याने मोठय़ा संख्येने परप्रांतीय तसेच इतर जिल्ह्य़ातील कामगार आपापल्या मूळ गावी निघून गेले होते. तेव्हापासून निर्माण झालेली परिस्थिती अजूनही कायम आहे.

गावांकडे गेलेले कामगार पुन्हा आणण्यासाठी सर्वच स्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात कामगार पुन्हा येऊ लागले असले तरी, त्याचे प्रमाण मर्यादित आहे. कामगारांची कंपनीच्या आवारातच निवासाची व्यवस्था करावी, यासारख्या अटी कंपन्यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. परजिल्ह्य़ातून येणाऱ्या कामगारांना विलगीकरण कक्षात रहावे लागते, त्यामुळे कामगारही येण्यास अनुत्सुक आहेत. सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांना पूर्वीप्रमाणे कामे मिळत नाहीत. व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू, सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. पुरवठादारांचे वेगळेच प्रश्न आहेत. सध्या खरेदीसाठी ग्राहक उत्सुक नाहीत. अशा अनेक अडचणी दिसत असल्याने उद्योगाचा गाडा सुरळीत होण्यास आणखी बराच कालावधी जाणार आहे.

उद्योग विश्वातील सर्वच प्रकारची कामे मंदावली आहेत. कामगारांचा तुटवडा आहे. स्थानिक रहिवासी कामासाठी फारसे पुढे येत नाहीत. जिल्हाबंदी कायम ठेवल्याने अडचणीत भरच पडते आहे. पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू होऊ शकलेले नाहीत. कामांची मागणी कमी आहे. सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. पुरवठादारांना विविध अडचणी भेडसावतात, त्याचा थेट परिणाम मोठय़ा उद्योगांवर होतात. पिंपरी-चिंचवड, चाकण, हिंजवडी, रांजणगाव, पिरंगूट अशा औद्योगिक पट्टय़ात एकसारखीच परिस्थिती आहे.

– बाळासाहेब कदम, उद्योजक