पुणे महिला संवेदनशील शहर व्हावे यासाठीचा आराखडा महापालिकेने तयार करून घेतला आहे. या अहवालातून शहरातील महिला स्वच्छतागृहांची वाईट अवस्था अधोरेखित झाली असून शहरातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत हे त्यांच्याच शब्दांत..
 
आहेत त्यांची स्वच्छता हाच प्रभावी उपाय
महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न शहरात सर्वच भागात आहे. स्वच्छतागृहांची परिस्थिती पाहून त्यांच्या दैनंदिन स्वच्छतेबाबत काय करता येईल याचा विचार आम्ही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गंभीरपणे सुरू केला आहे. त्यासाठी युवती मंचतर्फे सर्वेक्षणही करण्यात आले होते. त्यानंतर आयुक्तांसह अनेक संबंधित अधिकाऱ्यांबरोबर स्वच्छतेसंबंधी बैठकाही घेतल्या. चर्चा केली. सूचना केल्या. स्वच्छतेसाठी काय करता येईल याचा कृती कार्यक्रमही तयार झाला. मात्र, दैनंदिन स्वच्छतेकडे आजही म्हणावे असे लक्ष दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे अशक्य होते. म्हणजे जी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत त्यांचा उपयोग महिलांना होतच नाही.
महिला स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे ही गोष्ट खरी आहे; पण निदान आहेत त्या स्वच्छतागृहांची स्वच्छता रोज दोनदा व्हावी, हाच सध्याच्या परिस्थितीत सुधारणा घडवण्याचा पहिला प्रभावी उपाय आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर भर दिला असला, तरी तशी अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. नवीन स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहेच. त्यासाठीची कार्यवाही लगेच होईल असे नाही. मात्र, सध्याच्या स्वच्छतागृहांची अवस्था सुधारणे हे तरी तातडीने करण्याचे काम आहे आणि ते करणे शक्य देखील आहे. म्हणून त्यांची दैनंदिन देखभाल, स्वच्छता, गरजेनुसार वेळोवेळी दुरुस्ती याकडे लक्ष दिले, तर हा प्रश्न सुटू शकेल, हा पहिला उपाय.
महिलांच्या स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी खासगी उद्योजक, कंपन्या, व्यावसायिक पुढे आले, तर त्यातूनही काही ठोस उपाययोजना करता येईल. हा दुसरा उपायही करता येण्यासारखा आहे. गर्दीच्या ठिकाणी, महत्त्वाच्या जागी उद्योजकांनी फिरती स्वच्छतागृह उभी केली, तर महापालिका त्यांना जागा देईल तसेच जाहिरातीची परवानगी देईल. जाहिरात करण्याच्या मोबदल्यात खासगी उद्योजक संस्थानी स्वच्छतागृह उभारावीत आणि त्यांची देखभाल करावी, असा उपक्रम करणे शक्य आहे. काही संस्था, कंपन्यांनी शहरात अशा प्रकारे जी स्वच्छतागृह चालवली आहेत ती चांगल्या अवस्थेत असतात, असेही दिसते. तेथील स्वच्छता तसेच देखभाल याकडे लक्ष दिले जाते. स्वच्छतागृहांची रोज दोनदा स्वच्छता आणि खासगी सहभागातून गर्दीच्या ठिकाणी फिरती स्वच्छतागृह उभारणी या दोन पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल.
महापौर चंचला कोद्रे