05 June 2020

News Flash

रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून घरबसल्या मास्कची निर्मिती

रेल्वेच्या माध्यमातून कर्मचारी आणि इतरांना वितरण

रेल्वेच्या माध्यमातून कर्मचारी आणि इतरांना वितरण

पुणे : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरी असलेल्या रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या एका गटाने घरातूनही समाजोपयोगी उपक्रमाला सुरुवात केली आहे. या महिलांनी घरातच आपापल्या शिलाई यंत्राच्या माध्यमातून मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांनी तयार केलेले मास्क कामावर असणारे रेल्वे कर्मचारी आणि इतरांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक मात्र रेल्वेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने योग्य दक्षता घेऊन स्थानक आणि कार्यालयात काम करण्यात येत आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. पुणे रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक महिला कर्मचारी सध्या घरीच आहेत. मास्कच्या तुटवडय़ाच्या स्थितीत त्यातील २५ महिलांच्या गटाने घरातच मास्क तायार करण्याची योजना तयार केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही ही कल्पना उचलून धरली. संबंधित महिलांना मास्क तयार करण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये वापरले जाणारे नवे सुती कापड रेल्वेकडून या महिलांना उपलब्ध करून दिले जात आहे.  रेल्वेच्या विद्युत विभागातील २५ महिलांनी केवळ तीन दिवसांतच एक हजाराहून अधिक मास्क तयार करून रेल्वेकडे दिले आहेत.

एकदा वापरल्यानंतर स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येणाऱ्या या मास्कचे वाटप सध्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे मास्क उपयुक्त ठरत आहेत. महिलांकडून मास्कच्या निर्मितीचे काम सुरूच ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार इतरांनाही हे मास्क दिले जाणार आहेत. यापूर्वी मिरज येथे कार्यरत असलेले रेल्वे गार्ड विशाल कलगे यांच्या परिवाराने २३००हून अधिक मास्क तयार करून त्याचे मोफत वितरण केले. या सर्वच कर्मचाऱ्यांच्या या कामाबाबत पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा तसेच सहर्ष बाजपेई, नीलम चंद्रा, मुख्य वैद्यकीय व्यवस्थापक एम. रामकृष्णा, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता रघुनंदन प्रसाद मिश्रा यांनी अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 3:24 am

Web Title: production of homemade masks by female railway employees zws 70
Next Stories
1 पुण्यात उकाडा वाढण्याची शक्यता
2 रद्द केलेल्या रेल्वेच्या तिकीट परताव्यातही कपात
3 करोना संक्रमणाचे गणिती प्रारूप
Just Now!
X