करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ‘एन 95’ या विशिष्ट मास्कच्याच दर्जा प्रमाणे असलेल्या ‘एमएच 12’ या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या व्हेंचर सेंटर या इन्क्युबेशन सेंटरने या ‘एमएच 12’ मास्कचे संशोधन केले असून, १ लाख मास्कचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

करोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासून ‘एन 95’ मास्कची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग टाळण्यासाठी या मास्कची आवश्यकता असते. मात्र, ‘एन 95’ मास्कची मर्यादित उपलब्धता व काही तांत्रिक अडचणी असल्याचे दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘एन 95’  या मास्कच्याच दर्जाचा नवा मास्क तयार करण्यासाठी व्हेंचर सेंटरच्या ‘पुणे मास्क अ‍ॅक्शन ग्रुप’ने पुढाकार घेऊन संशोधन केले आहे. या संशोधनासाठी टाटा मुलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), भाभा अणू सशोधन केंद्र (बीएआरसी) आणि संरक्षण सशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांचेही सहकार्य लाभले आहे. प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने हा मास्क तयार करण्याची कामगिरी केली.

‘एमएच 12’ मास्कचा आराखडा तयार करण्यापासून चाचणीपर्यंतची सर्व प्रक्रिया दोन महिन्यांत करण्यात आली. आता आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांच्यासाठी एक लाख मास्क मोफत तयार करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अल्ट्रासॉनिक इंडस्ट्रीज या कंपनीच्या सहकार्याने या मास्कचे उत्पादन केले जाणार आहे,’ असे व्हेंचर सेंटरचे संचालक प्रेमनाथ वेणूगोपालन यांनी सांगितले. ‘एमएच 12’ या मास्कविषयीची माहिती http://www.venturecenter.co.in/masks/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

‘एमएच 12’ या मास्कची वैशिष्ट्ये
– पुण्यात संशोधन झाल्याने ‘एमएच 12’ हे नाव
– मास्कद्वारे संसर्ग रोखण्याची क्षमता ९५ टक्के
– मास्क परिधान केल्यावर श्वास घेण्याची सुविधा
– नोएडातील आयटीएस प्रयोगशाळेकडून प्रमाणित