सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनुभव केंद्र; देशातील पहिलाच प्रकल्प
पुणे : प्रचलित पद्धतीनुसार इमारतींच्या छपरांवर किंवा मैदानात सोलर पॅनेल बसवून सौर ऊर्जेची निर्मिती केली जाते. पण आता उंच इमारतीच्या काचेच्या भिंतीद्वारेही सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच आले असून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनुभव केंद्र उभारले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागात (स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज) हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या चारही भिंतींवर वैशिष्टय़पूर्ण अशा काचा बसवण्यात आल्या आहेत. या चार भिंतींद्वारे दररोज १४ ते १५ युनिट ऊर्जेची निर्मिती होऊ लागली आहे. सोलर स्केप एन्टरप्रायझेस या कंपनीने चीनमधून हे तंत्रज्ञान आणले आहे. सुरुवातीच्या काळात या काचांची भिंत उभारण्यासाठी आवश्यक साहित्याची जुळणी आणि पुढील टप्प्यात उत्पादनही केले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. विद्यापीठाच्या आवारात उभारलेल्या या अनुभव केंद्रामुळे ऊर्जा विभागाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळू शकणार आहे.
भिंतीद्वारे होणाऱ्या ऊर्जेच्या या अभिनव प्रकल्पाविषयी कंपनीचे संचालक दीपक गद्रे, अर्जुन गद्रे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ संचालक डॉ. रमेश ढेरे म्हणाले, की सध्या सौर ऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या फोटोव्होल्टेक (पीव्ही) तंत्रज्ञानाच्या तुलनेत या कॅन्डेमिअम टेलेरॉइड (सीडीटीई) तंत्रज्ञानाचा चीन आणि युरोपीय देशांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानामुळे उंच इमारतीच्या छतापेक्षा जास्त असलेल्या भिंतींच्या भागांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे शक्य झाले आहे.
शरद पवार यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन
अभिनव अशा या अनुभव केंद्राचे उद्घाटन येत्या रविवारी (१ मार्च) सकाळी नऊ वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल पवार आदी या वेळी उपस्थित राहणार आहे. या अनुभव केंद्राच्या उभारणीसाठी विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. संदेश जाडकर आणि प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. सुभाष घैसास यांनी मार्गदर्शन केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:07 am