तसेही निकाल वेळेत कुठे लागतात.. आम्ही काय सारखी कामेच करायची का.. सुट्टीच्या वेळीही उत्तरपत्रिका तपासण्याचे काम असते, मग कुटुंबाला वेळ कधी द्यायचा.. सगळ्याच शिक्षकांच्या अडचणी!
या प्रशांची उत्तरे इतरांकडे शोधण्यापेक्षा पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ती स्वत:च सोडवली आहेत, ती म्हणजे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या (कॅप) कामाला काही प्राध्यापकांनी चक्क दाडी मारून! त्यामुळेच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या केंद्रांवर सध्या शुकशुकाट असून, तिथे अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्राध्यापक दिसत आहेत.
परीक्षांचे निकाल नेहमीच उशिरा कसे लागतात, निकालात नेहमीच चुका कशा राहतात, हे पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना सतावणारे प्रश्न आहेत. मात्र, सध्या विद्यापीठाच्या काही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या केंद्रांमध्ये चक्कर टाकली, तर या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. परीक्षांच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांनी या कामांना बुट्टी मारल्याचे दिसत आहे. मुळातच निवडणुकांच्या कामांमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर परिणाम झाला आहे. निवडणुकांमुळे पुणे विद्यापीठाला परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले नसले, तरी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन उशिरा सुरू झाले असल्याचे समजते. एका प्राध्यापकांनी एका दिवशी साधारण ६० उत्तरपत्रिका तपासणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी शिक्षक येत नसल्यामुळे हे प्रमाण पाळले जात नसल्याची तक्रार काही शिक्षकच करत आहेत. या प्रमाणानुसार काम केले, तर निकाल लांबण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या मूल्यांकनाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येत असल्याची तक्रारही शिक्षकच करत आहेत.
कला शाखेच्या मूल्यांकनासाठी बोलावलेले शिक्षक येत आहेत, असे मूल्यांकन केंद्र सुरू असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यानी सांगितले. मात्र, कला शाखेच्या अनिवार्य विषयांसाठी अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक येत आहेत. मात्र, त्याबाबतही काही अडचण येणार नाही, असे या प्राचार्याचे म्हणणे आहे. सगळ्यात बिकट अवस्था अभियांत्रिकी शाखेच्या शिक्षकांची आहे. गेल्या परीक्षेच्या निकालाचे आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम आताच कुठे संपत आहे, तोपर्यंत पुढील परीक्षांचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या या परीक्षांच्या निकालातही गोंधळ होण्याची चिन्हे आहेत, असे मत शिक्षकांनीच व्यक्त केले आहे.
विद्यापीठाकडून कारवाई काय?
परीक्षांचे काम करणे ही शिक्षकांची जबाबदारी असली, तरी या कामासाठी बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांवर विद्यापीठ कठोर कारवाई करू शकत नाही. कारण शिक्षक हे विद्यापीठाचे नाहीत, तर ज्या संस्थेत काम करतात त्यांचे नोकर असतात. त्यामुळे कामात कुचराई करणाऱ्या शिक्षकांवर विद्यापीठ दंडात्मक कारवाई करू शकते आणि परीक्षांच्या कामांना बंदी घालू शकते. परीक्षांच्या कामांना घातलेली बंदी ही शिक्षकांच्या पथ्यावरच पडते. पदोन्नतीसाठी एपीआयमध्ये परीक्षांच्या कामाबाबत उल्लेख करणे आवश्यक असले, तरी परीक्षांचे काम वगळून बाकीच्या निकषांमध्ये पात्रता सिद्ध करून शिक्षक पदोन्नतीही मिळवू शकतात. त्यामुळे परीक्षांचे काम न करणाऱ्या शिक्षकांचे नेमके काय करायचे, हा विद्यापीठाला वर्षांनुवर्षे भेडसावणारा प्रश्न यावर्षीही भेडसावत आहे.