बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात ५६ टक्के घट झाली असून जूनअखेर संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा ११७.८७ कोटीपर्यंत खाली आला आहे. या बँकेची अनुत्पादक मालमत्ता तीनपट वाढल्याने हा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा २६६.३३ कोटी रुपये होता. बँकेची एकूण अनुत्पादक मालमत्ता १.८० टक्क्य़ांवरून ४.२३ टक्के झाली आहे.
या वर्षीतील दुसऱ्या तिमाहीतील बँकेची कामगिरी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम आणि आर.के. गुप्ता हेही उपस्थित होते.
बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ताही ०.८० टक्क्य़ांवरून २.९४ टक्के इतकी झाल्याने त्याचा नफ्यावर परिणाम झाला आहे. निव्वळ व्याजातील तफावत २.७० टक्के होती. निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे ठेवींवरील व्याज व कर्जावर मिळालेले व्याज यातील फरक १ टक्का वाढला. भांडवली परिपूर्णता गुणोत्तर १०.७५ टक्के झाले आहे. बँकेची उलाढाल ८.८८ टक्के इतकी वाढली असून ती २,०५,२०० कोटी झाली आहे. ठेवी १०.३५ टक्के वाढल्या आहेत. यावर्षी ठेवींचे प्रमाण १,१६,३६५ कोटी रुपये आहे. दरम्यान, बँकेला गेल्या वर्षभरात विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ठ बँक, कौतुकास्पद सेवा पुरविणारी बँक, उत्कृष्ठ तंत्रज्ञानाबद्दल गोल्ड पुरस्कार, आदींचा समावेश आहे.