कुणाला नवी कोरी सायकल हवी आहे, तर कुणाला बार्बी बाहुली हवीहवीशी वाटते आहे. कुणाला नवीन कपडे घालण्याची ओढ आहे, तर कुणाला ‘अँड्रॉइड’ फोन हाताळायचा आहे. ‘त्यां’च्या या सगळय़ा इच्छा रविवारी पूर्ण होणार आहेत.
‘ते’ कोण असा प्रश्न पडला ना?..ती सगळी लहान मुले आहेत. अगदी ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून १५ वर्षांपर्यंतच्या या मुलांचे दु:ख एकच आहे. त्यांना असाध्य आजारांनी ग्रासले आहे. पण त्यांचा खेळकरपणा आणि छोटय़ा छोटय़ा इच्छा इतर मुलांसारख्याच आहेत. या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही हात पुढे सरसावले असून, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या मुलांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.
‘मेक अ विश फाऊंडेशन’ आणि ‘के अँड क्यू ग्रुप’ या संस्थांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. के अँड क्यू ग्रुपचे सत्येंद्र राठी यांनी याविषयी माहिती दिली. राठी म्हणाले, ‘‘पुण्यासह अहमदनगर, बारामती आणि परिसरातील १६ लहान मुले कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. या सर्व मुलांना असाध्य आजार आहेत. पुण्यातील समारंभात या मुलांच्या हस्ते केक कापून त्यांनी मागितलेली वस्तू त्यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे.’’
या १६ मुलांपैकी तिघांनी त्यांना नवीन सायकल हवी असल्याचे सांगितले आहे. दोघांना नवे कपडे हवे आहेत, तर एकाला मनगटी घडय़ाळ घालायचे आहे. एका मुलाने रिमोटवर चालणारी मोटार मागितली आहे, तर दुसऱ्याला चक्क रिमोटवर चालणारे छोटे ‘जेसीबी’ यंत्र हवे आहे. दोघींना बार्बी बाहुली आणि त्या बाहुलीचे लहानसे घर हवे आहे.