05 March 2021

News Flash

विकासदरापेक्षा पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे – शेंडे

'देशात सर्वच जण विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना दिसतात. मात्र, विकासदरापेक्षाही देशातील पर्यावरणाच्या रक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता आहे.'

| January 26, 2014 03:05 am

देशात सर्वच जण विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना दिसतात. मात्र, विकासदरापेक्षाही देशातील पर्यावरणाच्या रक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता आहे, असे मत युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.
किलरेस्कर वसुंधरा महोत्सवाचा समारोप शनिवारी झाला. त्यात महोत्सवातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकत्रे समर कोटूर, प्रा. जे. टी .जॉनसिंग, चित्रपट निर्माते आशिष चंडोला, लेखक अतुल देऊळगावकर, पक्षीमित्र सतीश पांडे आणि हेल्प टुरिझम या संस्थेला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वनस्पतिशास्त्रज्ञ हेमा साने यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महोत्सवाचे आयोजक अतुल किर्लोस्कर, वन विभागाचे अधिकारी नितीन काकोडर, संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर, ‘गिरिकंद’चे सुहास गणपुले उपस्थित होते.
शेंडे म्हणाले की, पर्यावरणाचा सध्या मोठय़ा प्रमाणावर ऱ्हास होत आहे. ही आज सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, विकासाचा दर वाढविण्यासंदर्भात आपण नको तितकी चर्चा करत आहोत. पण, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही आजची सर्वात मोठी चिंताजनक बाब आहे. आपली संस्कृती पर्यावरणाशी संवाद साधणारी आहे. पण, आपल्या संस्कृतीकडून मिळालेली पर्यावरण संवर्धनाची शिकवण आपण विसरलो आहोत. जागतिक स्तरावर काम करणे सोपे असून स्थानिक स्तरावर बदल घडवून आणणे अवघड आहे. युनायटेड नेशन्समधील देशांनी २०१२ मध्ये वीस वर्षांनतर आपल्या कामाचा आढावा घेतला होता. वीस वर्षांपूर्वी या देशांनी ग्रीन हाऊसमधून होणारे घातक वायू पाच टक्के कमी करण्याचे ठरविले होते. प्रत्यक्षात हे वायू ४८ टक्क्य़ांनी वाढले होते.
हेमा साने म्हणाल्या की, निसर्गाचा आदर करण्यास आपण विसरलो आहोत. त्यामुळे निसर्ग काहीवेळा आपल्यावर आपत्ती निर्माण करतो. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी पसे खर्च करावे लागत नाहीत. मात्र, आपणे फक्त आपल्या बँकेच्या पासबुकच्या चिंतेमध्ये असल्यामुळे आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्यास वेळ मिळत नाही. प्रत्येकाने निसर्गाचा आदर करण्यास शिकले पाहिजे.
जॉनसिंग म्हणाले की, पुणे शहरामध्ये मोठय़ा प्रमाणावर झाडे आहेत. पण, अनेक झाडांच्या भोवती सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पूर्वी झाडांच्या भोवती मातीचा कट्टा केला जात होता. सिमेंटच्या कट्टयांमुळे झाडांचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे सिमेंटच्या कट्टय़ातून झाडांची सुटका झाली पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 3:05 am

Web Title: progress rate vasundhara festival rajendra shende greenhouse nature
टॅग : Nature
Next Stories
1 एक लाख नागरिकांनी घेतला ‘सारथी’ चा लाभ
2 न्यायालयातून पळून गेलेल्या गुन्हेगाराला दोन वर्षांनंतर अटक
3 पांडवनगर आणि वडारवाडीतील दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई
Just Now!
X