23 July 2019

News Flash

मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे पुरावे हवेत

राजकीय पक्षांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

केवळ तक्रार केली म्हणून केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर होणार नाही

राजकीय पक्षांनी मतदार संघातील एखादे मतदान केंद्र संवेदनशील असल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित परिसर संवेदनशील का आहे, हे राजकीय पक्षांना पुरावे देऊन सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतरच पोलिसांकडून चौकशी होऊ न मतदान केंद्र आणि परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केले जाईल. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्राबाबत तक्रार केल्यानंतर राजकीय पक्षांना त्याबाबचे पुरावेही द्यावे लागणार आहेत.

राजकीय पक्षांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राजकीय पक्षांनी काही मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. त्या वेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी राजकीय पक्षांनी तक्रार केली, की लगेच कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘तक्रार करणाऱ्या राजकीय पक्षांना संबंधित परिसर कसा संवेदनशील आहे, हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.

त्यामुळे केवळ तक्रार करून चालणार नाही, तर त्याबाबतचा तपशील राजकीय पक्षांना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच मतदान केंद्र आणि परिसर संवेदनशील म्हणून घोषित करण्यात येईल. त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल,’ असेही पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.

केवळ राजकीय पक्षांच्या मागणीवरून कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील ठरवले जाणार नाही. त्यासाठी तक्रार करणाऱ्या राजकीय पक्षांना त्याबाबतची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पोलिसांकडून अधिक तपास करून संवेदनशील मतदान केंद्र जाहीर होणार आहे.

सात हजार ६६६ मतदान केंद्रे

पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदार संघांमध्ये सात हजार ६६६ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये चारशेने वाढ होणार आहे. त्यापैकी ६९ मतदान केंद्रांमध्ये मोबाइल सेवा उपलब्ध नाही. तसेच ४८ गावांमधील ९८ मतदान केंद्रांमध्ये आंतरजालाची (इंटरनेट) सुविधा नाही. इमारतींच्या तळमजल्यावर जास्तीत जास्त मतदान केंद्रे असतील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. सहा हजार ५८१ मतदार केंद्रे तळमजल्यावर असून, पहिल्या मजल्यावर ८८४ आणि दुसऱ्या मजल्यावर २०१ मतदान केंद्र असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघात एक हजार १९२, पुणे मतदारसंघात एक हजार ९४४, बारामती मतदारसंघात दोन हजार ३०३ आणि शिरूर मतदारसंघात दोन हजार २२७ मतदान केंद्रे आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील गुन्हे

गेल्या लोकसभा निवडणुकीत दाखल गुन्हे- ७६, दाखल दोषारोपपत्र- ७२, गुन्ह्यतील आरोपींना शिक्षा एक, आरोपींची निर्दोष सुटका चौदा आणि न्यायालयात प्रलंबित असलेले दावे ५७

First Published on March 15, 2019 12:55 am

Web Title: proof of polling station is sensitive