News Flash

अजित पवार यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत तिपटीहून अधिक वाढ!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेमध्ये पाच वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.

| September 27, 2014 03:20 am

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेमध्ये पाच वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. अजितदादांनी २००९ मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्रामध्ये पती-पत्नीची मिळून १० कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता दाखविली होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी दाखल केलेल्या वितरणपत्रानुसार ही मालमत्ता ३७ कोटींहून  अधिक झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांत त्यांची मालमत्ता तिपटीहून अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाबरोबर त्यांची मालमत्तेचे विवरण पत्र दिले असून, त्यानुसार अजित पवार व त्यांच्या पत्नीची मिळून एकूण मालमत्ता सुमारे ३७ कोटी ९३ लाख रुपयांची आहे. अजित पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे २१ कोटी रुपये, तर सुनेत्रा पवार यांची एकूण मालमत्ता १६ कोटींपेक्षाही अधिक आहे. २००९ मध्ये दिलेल्या विवरणपत्रानुसार अजित पवार यांच्याकडे सुमारे सात कोटी, तर सुनेत्रा यांच्याकडे सुमारे चार कोटी रुपयांची मालमत्ता होती. पाच वर्षांत अजित पवारांच्या मालमत्तेत १४ कोटींची, तर सुनेत्रा यांच्या मालमत्तेत सुमारे १२ कोटींची वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.
अजित पवार यांच्याकडे तीन कोटी १० लाख ४३ हजार ४२० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात ७ लाख ७१ हजार ३९६ रुपयांची रोकड, ७२ लाख ७८ हजारांच्या ठेवी, २९ लाख १४ हजारांचे शेअर्सचा समावेश आहे. त्यांच्याकडे १८ कोटी ३ लाख ६६ हजार रुपयांची स्थावर मालमता आहे. त्यात काटेवाडी, इंदापूर, लोणीकंद आदी ठिकाणी वारसाहक्काने मिळालेली शेती, स्वत: घेतलेली शेती व बिगरशेती जमिनीचा समावेश आहे. गोडाऊन, निवासी व व्यापारी इमारतींचाही त्यात समावेश आहे. सुनेत्रा यांच्याकडे १२ कोटी रुपयांची जंगम, तर ४ कोटी ७९ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. पवार दाम्पत्यावर कर्जही असून, सुनेत्रा यांच्या नावे तब्बल १० कोटी १९ लाख रुपयांचे, तर अजितदादांच्या नावावर एक कोटी १६ लाख रुपयांचे कर्ज आहे.
 
दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर..!

शासकीय वाहने वगळता अजित पवार आजपर्यंत वेगवेगळ्या आलिशान मोटारीतून अनेकदा दिसून आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या नावावर फारशा मोटारी नाहीत. होंडा अॅकॉर्ड ही मोटार वगळता दोन ट्रॅक्टर व चार ट्रेलर अजितदादांनी स्वत:च्या नावावर दाखवली आहेत. पत्नी सुनेत्रा यांच्याकडे मात्र कोणतेही वाहन नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:20 am

Web Title: property of ajit pawar incresed three times within 5 years
Next Stories
1 सोमवारी रंगणार ‘मोडी’ मित्रांचा मेळावा
2 पिंपरीच्या महापौरांसह राष्ट्रवादीच्या २५ नगरसेवकांपुढे पेच!
3 परस्पर विरोध आणि कुरघोडीचे राजकारण!
Just Now!
X