पीएमपी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहा वेळा तिकीट दरवाढ झाली असून अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, फसवणूक झाकण्यासाठीच मनमानी पद्धतीने दरवाढ केली जात आहे. संचालक मंडळाने प्रवाशांचा विचार करून दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने केली आहे. प्रशासन व संचालक मंडळ कोणाच्या हितासाठी काम करत आहे, अशीही विचारणा संघटनेने केली आहे.
पीएमपी प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला असून तो संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला प्रवासी मंचने विरोध केला असून दरवाढ करताना आधी घटत्या प्रवासी संख्येचा विचार करा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केले आहे. एप्रिल २०१० मध्ये पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या १२.८१ लाख होती. ती सातत्याने घटत असून मार्च २०१४ मध्ये ही संख्या १०.५६८ लाखांवर आली आहे. ताफ्यातील गाडय़ांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी प्रवासी संख्या मात्र सतत घटत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
प्रशासनाची अकार्यक्षमता, गैरव्यवहार तसेच ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे धोरण यामुळे दरवाढ करावी लागत आहे. गैरप्रकार झाकण्यासाठी दरवेळी डिझेल, सुटे भाग, सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करून दरवाढ केली जात आहे. मात्र वाढीव कार्यक्षमता, काटकसर यांचे आश्वासन देऊन केलेल्या भाडेवाढीचा लेखाजोखा कधीच दिला जात नाही. वाढीव उत्पन्न किती, ते कशासाठी वापरले, तरीही तूट का येत आहे, प्रवासी संख्येत सातत्याने घट का होत आहे, याची उत्तरे प्रशासन का देत नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वास्तविक रोज बंद राहणाऱ्या सहाशे गाडय़ा मार्गावर आणल्या तरीही उत्पन्न ५० लाखांनी वाढू शकते याकडे लक्ष द्यावे, ठेकेदाराबरोबर केलेल्या चढय़ा दरांच्या करारामुळे तोटा वाढत आहे त्याचा पुनर्विचार करावा आदी अनेक सूचना संघटनेने केल्या असून भाडेवाढीचा प्रस्ताव संचालकांनी फेटाळून लावावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.