शिक्षण आयुक्तांकडून प्रस्ताव सादर

पुणे : राज्यात हिवाळ्याच्या काळात डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये सकाळच्या शाळा सकाळी साडेसातनंतर भरवाव्यात, असा अभिप्राय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिला आहे. शाळेच्या वेळेत बदल करणे ही धोरणात्मक बाब असल्याने त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत शाळा भरण्याच्या वेळेत बदल होणार का, असा प्रश्न आहे.

थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची वेळ बदलण्याची मागणी पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. अन्य राज्यांमध्ये प्रशासनाकडून हिवाळ्यात शाळेच्या वेळेत बदल करण्यात येतो. त्या प्रमाणेच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या वेळेत हिवाळ्यात कायमस्वरूपी बदलण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण आयुक्तांनी शालेय शिक्षण अपर मुख्य सचिवांना शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे.

शाळेच्या वेळेसंदर्भात यापूर्वीच राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी अभिप्राय दिले आहेत. हिवाळ्यात सकाळच्या शाळा  साडेसात वाजण्याच्या अगोदर भरत असल्यास मुलांना एक तास अगोदर घर सोडावे लागते. त्या वेळी अंधार असतो. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या शाळा साडेसातनंतर भरवाव्यात, असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे शासनस्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा असे आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.