डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या सिंहगड घाट रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. घाट रस्त्यात संरक्षक जाळ्या बसवण्याचे कामही अपूर्ण असून त्यापाठोपाठ सिमेंट रस्त्याचे कामही रखडले आहे. ही दोन्ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, ती पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. रस्त्याच्या कामाला विलंब होण्याची शक्यता अधिक आहे.

डिसेंबरमध्ये सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आले. काम सुरू झाल्यानंतर अडीच महिन्यांसाठी सिंहगडाचा घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. या कामाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले असून त्यानुसार पीडब्ल्यूडीकडून कार्यवाही करण्यात येत आहे. गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर दरडी कोसळणे, कडे-कपारीतील सैल झालेले दगड पडणे अशा घटना दरवर्षी पावसाळ्यात घडतात. तसेच सध्या घाट रस्ता अत्यंत खराब झाल्याने पीडब्ल्यूडीने रस्त्याचे काम हाती घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात गडावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतर मार्च महिन्यात आणि त्यानंतरही काही कारणांनी काम थांबवण्यात आले होते. घाट रस्त्याच्या कामासाठी साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे.

दरम्यान, घाट रस्त्याचे काम दोन टप्प्यात सुरू असून सिमेंटचा रस्ता तयार झाला आहे. परंतु, हा रस्ता मूळ रस्त्यापेक्षा उंच आणि अरुंद झाला आहे. परिणामी, या रस्त्यावरून दोन गाडय़ा एकाचवेळी समोरासमोर आल्यास त्या घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराकडून साईडपट्टय़ा तयार करण्याच्या कामात चालढकल केली जात आहे.

‘गडाच्या पायथ्याला रस्त्याची रुंदी कमी केल्याने रस्त्याच्या कडेला मुरूम आणि खडी टाकून रस्ता दुरूस्त करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले होते. हे काम अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नाही. परिणामी रस्त्यावर पाणी साचत आहे. हा रस्ता सिमेंटचा असल्याने तो निसरडा होऊन वाहनांचे अपघात होत आहेत. याबाबत गेल्या एक महिन्यापासून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराशी संपर्क करूनही संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही’, अशी माहिती घेरा सिंहगडचे उपसरपंच अमोल पढेर यांनी दिली.

गडाच्या पायथ्याजवळच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून कडेच्या पट्टय़ा भरण्याचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने गडावर पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे कामाच्या वेळा बदलण्याबाबत वन विभागाला कळवण्यात आले असून त्यांच्याकडून कामाच्या वेळा बदलण्याबाबत सहकार्य मिळाल्यास जुलैअखेपर्यंत काम पूर्ण होऊ शकेल. अन्यथा, त्यापेक्षा अधिक कालावधी रस्त्याच्या कामासाठी लागेल.

– डी. एन. देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग