News Flash

सिंहगडावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण

सिंहगड घाटरस्त्यावर पावसाळ्यात कडे, कपारीतील सैल झालेले दगड कोसळण्याच्या घटना घडतात.

सिंहगडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला

पुणे : सिंहगडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. संरक्षक जाळ्या बसवण्याच्या कामासाठी गडावर नेण्यात आलेली अवजड यंत्रे आणि इतर सामग्री उतवण्यात आली आहे. परिणामी, गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला सिंहगड घाटरस्ता नव्या वर्षांत पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

सिंहगड घाटरस्त्यावर पावसाळ्यात कडे, कपारीतील सैल झालेले दगड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत घाटातील दहा ते बारा धोकादायक ठिकाणे शोधून संबंधित ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम ३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले होते.

हे काम करण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याशिवाय वन संवर्धन अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमांमधील तरतुदींचा भंग होऊ  नये म्हणून हे काम करताना वनक्षेत्रात माती उकरणे, गवत साफ करणे, वाहनांची वाहतूक आदी गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले होते. संरक्षक जाळ्या बसवण्याच्या कामासाठी पोकलेन, अवजड यंत्रसामग्री गडावर नेण्यात आली होती. त्यांच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले असून ही यंत्रे खाली उतरवण्यात आली असून घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

वन विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सव्वा कोटी रुपये निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या जाळ्या बसवण्याचे काम पायोनिअर इंजिनिअिरग कंपनीला देण्यात आले होते. मुदतीमध्ये हे काम पूर्ण करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

डांबरी रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात

सिंहगड घाट रस्त्यावरील दहा ते बारा धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्यात आले होते. ठेकेदाराकडून विहित कालावधीत हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करून घेतले. त्यानुसार घाटरस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असून गडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षांत दुसऱ्या आठवडय़ापर्यंत हे कामही पूर्ण करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी. ई. चौगुले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:51 am

Web Title: protective nets work finished at dangerous place of sinhagad zws 70
Next Stories
1 हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सरत्या वर्षांला निरोप
2 ‘मुलांना समजून घेताना’
3 राज्यातील शिक्षकांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांतर्फे जागृती