कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर कोल्हापूर येथे सकाळी गोळ्या घालून केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा पुणे शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र निषेध करुन, निदर्शने करण्यात आली. तसेच हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच हल्ले खोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन नानासाहेब गोरे अकादमीतर्फे पानसरे यांच्यावरील हल्लय़ाचा तीव्र निषेध केला आहे. मनपाचे सभासद रविंद्र माळवदकर यांनी पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, नथुराम गोडसे प्रवृत्तीचा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसंग्रामतर्फे पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दलच्या वतीने पानसरे यांच्यावर झालेल्या हल्लय़ाचा निषेध व्यक्त केला असून, असे केल्याने विचार संपणार नसल्याचे पारुंडेकरांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हा हल्ला निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो,असे म्हटले आहे. नॅशनल मुस्लिम फ्रंटतर्फे पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, दाभोलकर व पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.