कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील पूर ओसरला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना तात्पुरत्या मदतीऐवजी कायमस्वरुपी उपयोगी पडणाऱ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने जीवनावश्यक आणि शालेय वस्तूंचा संच पूरग्रस्तांना तसेच तेथील विद्यार्थ्यांना देण्याची योजना तयार केली आहे. हे संच पुरवण्यासाठी पुण्यातील संस्था आणि व्यक्तींना सहाय्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील पूरग्रस्त भागात शालेय विद्यार्थ्यांना बालभारतीकडून पुस्तके पुरवण्यात येणार असून उर्वरित शैक्षणिक साहित्य, तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. या भागातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना पुस्तकांव्यतिरिक्त उर्वरित शालेय साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वही, पेन, पेन्सिल अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार संचांची या भागात गरज होती. त्यापैकी शैक्षणिक साहित्याचे एक लाख पाच हजार संच उपलब्ध झाले आहेत. पूरग्रस्तांना तात्पुरत्या मदतीऐवजी कायमस्वरुपी उपयोगी पडणाऱ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने जीवनावश्यक आणि शालेय वस्तूंचा संच तयार केला आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या संचात गव्हाचे पीठ, तांदूळ, रवा, तूरडाळ, मूगडाळ, बेसन पीठ, मीठ, गोडेतेल, हळद, साखर, चटई, डास प्रतिबंधक अगरबत्ती यांचा समावेश असून, या एका संचाची किंमत तीन हजार रुपये आहे. शालेय साहित्य संचामध्ये दप्तर, वह्य़ा, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, पायमोजे या वस्तूंचा समावेश असून या संचाची किंमत चारशे रुपये आहे. कोल्हापूर, सांगलीत प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एक लाख संचांची गरज असून त्यासाठी ३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

हे संच घेण्यासाठी नागरिकांनी आर्थिक स्वरुपाची मदत केल्यास पूरग्रस्तांना आधार मिळणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागाच्या उपआयुक्त तथा पूरग्रस्त मदत कक्षाच्या समन्वयक नीलिमा धायगुडे यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीत पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत होत आहे. गावांत पुराचे पाणी असताना व पाणी ओसरल्यानंतरही पुण्यातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळांनी पूरग्रस्त गावांत धाव घेऊन मदत केली. तसेच अनेक सर्वसामान्य नागरिकांकडून विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात मदतीचा ओघ अखंडपणे सुरू आहे.

पुणेकरांकडून मदतीचा अखंड ओघ

कोल्हापूर, सांगलीत पुण्यातील विविध सामाजिक संस्था, व्यक्तींकडून अखंड मदतीचा ओघ सुरू आहे. सुरुवातीला पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि खाद्यपदार्थ देण्यात आले होते. पुरामुळे अनेक कुटुंबांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. ही कुटुंबे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बाधितांना जनावरे देण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.