युनिव्हर्सल अकौंट नंबर (यू. ए. एन.) सक्रिय करून घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबरोबरच संगणकाचे ज्ञान नसल्यामुळे ज्यांना हा नंबर सक्रिय करून घेता येत नाही, अशा व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशातून ‘पॅ्राव्हिडंट फंड आपल्या दारी’ योजना राबविण्यात येत आहे.
कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच एम्प्लॉईड प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या संघटनेतर्फे १५ ते ३१ मे या कालावधीत ‘प्रॉव्हिडंट फंड आपल्या दारी’ योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १३ बैठे आणि ४ फिरते मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. हडपसर, बारामती, मुंढवा, रांजणगाव एमआयडीसी, येरवडा, बुधवार पेठ, बिबवेवाडी, एरंडवणा, पिंपरी, चिंचवड, चाकण, आकुर्डी येथील पीएफ अॅनेक्स बिल्डिंग, पुणे लष्कर येथील पीएफ मुख्य इमारत येथे हे मेळावे होणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्ह्य़ाच्या भविष्य निधी आयुक्त वैशाली दयाल यांनी दिली.
‘यू. ए. एन.’ नंबर सक्रिय केल्यामुळे भविष्य निधी कर्मचाऱ्यास त्याच्या भविष्य निधीचा दरमहा किती भरणा होतो ते मोबाईलवर किंवा संगणकावर पाहता येईल. ई-पासबुकद्वारे त्याच्या भविष्य निधी रकमेचा तपशील प्रिंट करून घेता येईल. अनेक भविष्य निधी खात्यांना तो एकाच यू. ए. एन. नंबरखाली आणू शकेल. त्याचा भविष्य निधी प्रपत्र १४ न भरताही तो संगणकाद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकेल. या योजनेअंतर्गत नियोक्तयास (एम्प्लॉयर) रकमेचा भरणा भविष्य निधी रकमेचा भरणा इंटरनेट बँकिंगद्वारे १ मे पासून अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे १ मे आधीच सुमारे ५० टक्के नियोक्तयाने भविष्य निधी भरणा इंटरनेट बँकिंगद्वारे केला असल्याचे वैशाली दयाल यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी गुरुनाथ (मो. क्र. ९९७५२४२६२७) यांच्याशी किंवा पुणे आणि आकुर्डी येथील भविष्य निधी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.