स्वातंत्र्यवीर सावरकर व वीराग्रणी डॉ. नारायणराव सावरकर यांचे नातू तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य पृथ्वीराज सावरकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मृणाल, मुलगी भाग्यश्री, आई स्वामिनी, भाऊ रणजित असा परिवार आहे.

पृथ्वीराज सावरकर यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. स्मारकाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला. सावरकरांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावेत, या ध्येयाने ते काम करत होते. पृथ्वीराज सावरकर यांनी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक; तसेच स्वा. सावरकर सेवा समितीचे ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’ या दोन्ही संस्थांमधून स्वा. सावरकर यांच्या विचारांनुसार विविध प्रकल्प सुरू होण्यासाठी सातत्याने काम केले. त्यांनी पुण्यात ‘हर्षद खाद्यपदार्थ’ हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला. वडील विक्रमराव सावरकर यांच्या हिंदू संघटन तसेच राष्ट्रहिताच्या कृतिशील कार्यात पृथ्वीराज सावरकर यांचा नेहमीच सहभाग होता.

दरम्यान, सावरकर यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सावरकर यांच्या जाण्यामुळे स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने एक कृतिशील कार्यकर्ता, मार्गदर्शक तसेच आधारस्तंभ गमावला आहे,’ अशा शब्दांत स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.