News Flash

डॉ. मोहन आगाशे यांचे आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

करोनामुळे नाटक, चित्रपट थांबले आहेत याकडे लक्ष वेधले असता, ‘सगळ्यांचीच ही अवस्था झाली आहे.

अल्पविराम घेत खूप काही तपासून घ्यायचे आहे!
पुणे : पुरात माणसे वाहून जातात तसा समाज वाहत चालला आहे का? मनुष्य जातीचे भान सुटत चालले आहे का? भानावर असू तर, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आयुष्यात काय बदल करायला हवेत? असे प्रश्न मला पडले आहेत. आता आयुष्याच्या या टप्प्यावर अल्पविराम घेत खूप काही तपासून घ्यायचे आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी गुरुवारी व्यक्त केली.

रंगभूमी-चित्रपट अभिनेते, ग्रीप्स रंगभूमीची नाटके रंगभूमीवर आणणारे निर्माते, नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष, ‘अस्तू’ आणि ‘दिठी’ चित्रपटांचे निर्माते अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडणारे डॉ. मोहन आगाशे शुक्रवारी (२३ जुलै) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना सध्या भूमिका करत असलेल्या ‘जरा समजून घ्या : पेशंटने की डॉक्टरने’ या नाटकाने आनंद दिल्याचे त्यांनी सांगितले.

करोनामुळे नाटक, चित्रपट थांबले आहेत याकडे लक्ष वेधले असता, ‘सगळ्यांचीच ही अवस्था झाली आहे. कलाकार म्हणून माझा विचार वेगळा कसा करू शकतो?’ असा सवाल आगाशे यांनी उपस्थित केला. पडद्यावर दिसणारा कलाकार मोठा आणि पडद्यामागे काम करणारे लहान आहेत का? मदत न मागता  छोटी-मोठी कामे करत तेही लढत आहेत. मात्र, दुर्दैवाने आमच्याकडे करोनाचे राजकारण केले जात आहे. नसलेली प्रगती दाखवीत राजकारणी उड्या मारत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

करोनाकडे आपण शत्रू म्हणून नाही तर निसर्गाचा संदेशक म्हणून पाहिले पाहिजे. आपण निसर्गाचा भाग आहोत हेच विसरत चाललो आहोत. आपल्या गरजा काय आहेत हे तपासून घेण्याची संधी करोनाने दिली. चैन हीच माणसाची गरज होत आहे का, याकडे प्रत्येकानेच लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. आगाशे यांनी व्यक्त केली.

वाढदिवसाला अनन्यसाधारण महत्त्व…

आवडीचा गोड पदार्थ करून लहानपणी आई माझे औक्षण करायची. आता हे कुठे राहिले आहे? ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रुपवर छापील शुभेच्छा येणार. वाढदिवस ही वैयक्तिक बाब असल्यामुळे वाढदिवसाला अनन्यसाधारण महत्त्व येऊ नये, असे आज वाढदिवस असलेल्या नेत्यांच्या जाहिराती पाहिल्यानंतर जाणवते, अशी टिपणी डॉ. मोहन आगाशे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:04 am

Web Title: psychiatrist dr mohan agashe financial life theater film actors grips theater plays akp 94
Next Stories
1 पुणे : खडकवासला ९६ टक्के भरलं, नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
2 Swapnil Lonkar Suicide : स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं
3 एकेरी रस्त्यांवर दुहेरी वाहतूक
Just Now!
X