पुणे जिल्ह्यातील माळवाडी येथे किरकोळ कारणावरून मुलाने आईचा खून केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशिरा समोर आली असून मुलाविरोधात तळेगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीवर आठ दिवसांपूर्वी मनोरूग्ण रूग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मुलगा राम बाळासाहेब दाभाडे (वय २७, रा. शितलादेवी मंदिर शेजारी, माळवाडी, जि. पुणे) याचे आई मीना बाळासाहेब दाभाडे (वय ५५) हिच्याबरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रागाच्या भरात रामने गॅस सिलिंडरच्याल टाकीने आईचे डोकं ठेचले. यात गंभीर जखमी होऊन आई मीना यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रामवर मनोरुग्ण रुग्णालयात तीन महिन्यांपासून उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. या वेळी घरात वडील, काका आणि चुलत भाऊ होते. काका शांताराम सीताराम दाभाडे यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर हे करत आहेत.