गेल्या तीन दिवसांपासून झाडावर चढून बसलेल्या मनोरुग्णास खाली उतरविण्यास रेल्वे पोलीस, स्थानिक नागरिक अपयशी ठरल्यानंतर सोमवारी दुपारी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला दुपारी खाली उतरविले. त्याला खाली उतरवित असताना पडल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्टेशनच्या मालधक्का येथील एका झाडावरून गोदामावर हा मनोरुग्ण चढला. या ठिकाणी काम करणाऱ्या हमालांनी व नागरिकांनी त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला.  त्याला खाऊचे पदार्थ, पैसे देण्याचे आमिषही दाखविले. त्याला येथील रेल्वे पोलिसांनी खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलीस कर्मचारी सुनील माने, हमाल रमाकांत आल्हाट यांना लाथा मारून ढकलून दिले. यामध्ये ते दोघेही जखमी झाले आहेत. तो झाडावरून गोदाम अशा चकरा मारत होता.
तो खाली उतरत नसल्यामुळे सोमवारी दुपारी अग्निशामक दलास बोलाविण्यात आले. अग्निशामक दलाचे अधिकारी रमेश गांगड, रफीक शेख हे दोन गाडय़ा घेऊन पोहचले. त्यांनी त्याला उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी तो मनोरुग्ण हातात दोन मोठी लाकडे घेऊन मारायला धाऊन येत असल्यामुळे त्याच्या जवळ जाणे शक्य नव्हते. शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी खाली झोळी करून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दरम्यान तो गोदामावरून तोल जाऊन खाली पडला. पडल्यानंतरही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले. तो आपले नाव पवार सांगत असून जखमी झाल्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.