स्वरसिद्धी आणि रससिद्धी प्राप्त झालेले कलाकार.. आपल्या अलौकिक स्वरांनी ‘भीमसेनी’ नाममुद्रा प्रस्थापित करत किराणा घराण्याच्या गायकीला स्वतंत्र ओळख निर्माण करून देणारे गायक.. मैफिलीमध्ये श्रोत्यांवर स्वरांचे गारूड घालणारे ‘स्वराधिराज’.. ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ आणि ‘सवाई गंधर्व स्मारक’ या माध्यमातून गुरू सवाई गंधर्व यांचे कलारूपी आणि वास्तूरूपी स्मरण करणारे महान शिष्य.. कलाकारांचा आदर करणारे आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व.. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची विविध रूपे अनुभवताना ‘पंडितजींचा महिमा वर्णावा किती’ अशी भावना संगीत क्षेत्रातील कलाकारांनी व्यक्त केली.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. हे औचित्य साधत संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांनी पंडितजींविषयीच्या भावना व्यक्त करताना भीमसेन जोशी या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गुरुवारी सवाई गंधर्व स्मारक येथे पंडितजींच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. पंडितजींच्या चाहत्यांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सवाई गंधर्व स्मारक येथे जाऊन आपल्या भावना व्यक्त करता येतील.

जीवनातील अविभाज्य सूर

पं. भीमसेन जोशी यांचा स्वर हा आपल्या सर्वाच्या जीवनातील अविभाज्य सूर आहे. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देतो हे खरे असले तरी स्वरांच्या माध्यमातून ते अमर आहेत. गायनासाठी आवाज लावण्यापासून ते गायन प्रस्तुतीपर्यंत स्वतंत्र शैली निर्माण करीत पंडितजींनी ‘किराणा’ घराण्याच्या गायकीला समृद्ध केले. पं. सुरेशबाबू माने यांच्याकडे मी गायन शिकत असताना पंडितजी त्यांना भेटण्यासाठी येत असत. तेथेच मी त्यांना पहिल्यांदा पाहिले. मी गायन मैफील करण्यास सुरुवात केली तोपर्यंत भीमसेनजी यांच्या नावाला वलय प्राप्त झाले होते. किराणा घराण्याचे मोठे गायक या नात्याने माझ्यासाठी ते कायमच आदरणीय व्यक्तिमत्त्व राहिले आहे. विविध कार्यक्रमांमधून आमची भेट होत असे.

– डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

दर्जेदार आणि आकर्षक

लहानपणापासूनच मी पंडितजींच्या गाण्याचा चाहता आणि अभ्यासक आहे. किराणा घराण्याचे गायक असले तरी वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकीतील चांगले ते वेचून त्यांनी आपली गायकी समृद्ध केली होती. दैवी देणगी लाभलेल्या आवाजावर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. गोलाईयुक्त घुमारा बनविण्याची सिद्धी त्यांनी प्राप्त केली होती. दर्जेदार गोष्ट आकर्षक असतेच असे नाही. पण, पंडितजींचे गाणे दर्जेदार आणि आकर्षकही होते. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ठुमरी, अभंग, नाटय़गीत हे गायन प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. रसिकांनी त्यांना देव मानले होते. कोलकाता येथे त्यांची मैफील झाल्यानंतर त्यांना नमस्कार करण्यासाठी रांग लागली होती, याचा मी साक्षीदार आहे. त्यांना खूप ऐकता आले हे पुणेकरांचे भाग्यच आहे.

– पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक

प्रत्येकाशी संवादी गायन

पंडितजींनी मैफील सुरू करताच पहिल्या षड्जामध्येच त्यांच्या साधनेचे प्रखर तेज आणि त्यांचा दमसास याची प्रचिती येत असे. प्रत्येक व्यक्तीच्या मूलतत्त्वांशी संवाद साधणारे असेच त्यांचे गायन होते. त्यांचा मोठेपणा कधीही त्यांच्या वागण्यामध्ये दिसला नाही. मितभाषी असलेले पंडितजी कमी शब्दांत व्यक्त होणारे पुणेकर होते. माझे गुरू पं. वसंतराव कुलकर्णी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंडितजींनी दुपारच्या वेळी ‘सारंग’चे सूर आळवले.  तबला आणि बंदिश सुरू होण्यापूर्वी केवळ षडजामध्येच राग उभा करण्याचे सामथ्र्य त्यांच्या गायकीमध्ये होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असाच आहे.

– आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध गायिका

त्यांच्यामुळे आयुष्य उजळले

‘पंडितजींचा साथीदार’ हे बिरूद लागल्याने माझे आयुष्य उजळून निघाले. लहानपणापासून पंडितजींच्या गाण्याचा माझ्यावर पगडा आहे. या ‘स्वराधिराजा’ला संगत करण्याची संधी मिळावी हे स्वप्न पंडितजींच्या पुढाकारानेच सत्यामध्ये आले. टिळक स्मारक मंदिर येथे १९८९ मध्ये झालेल्या ‘संतवाणी’ला मी पहिल्यांदा त्यांना तबल्याची साथ केली; तेव्हा मी २१ वर्षांचा होतो. सलग १८ वर्षे त्यांनी मला सांभाळून घेतले. ते मोटार चालवीत असताना शेजारी बसून मी अनेकदा त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे. ‘गायक हा उत्तम चोर असला पाहिजे,’ असे ते नेहमी सांगत. विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून त्यांच्यासमवेत हैदराबाद ते मुंबई असा प्रवास केलेला मी एकमेव संगतकार असेन.

भरत कामत, प्रसिद्ध तबलावादक