सार्वजनिक गणेशोत्सव यंदा १२६ व्या वर्षांत पदार्पण करत असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी कधीच मान्य केलंय. सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भातील भाऊसाहेब रंगारी ट्रस्टची भूमिका मान्य असून भाऊसाहेब रंगारी यांनीच पहिल्यांदा गणेशोत्सवाला सुरुवात केली तर लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा प्रसार केला, हे मुक्ता टिळक यांनी मान्य केल्याची एक ध्वनिफित ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केली. या ध्वनीफितीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांनीच पहिल्यांदा गणपती बसवून सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. तर या उत्सवाचा लोकमान्य टिळकांनी अधिक प्रभावीपणे प्रसार केला, असे मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे.

या संदर्भात ट्रस्टचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापौरांसोबत झालेल्या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो पालिकेला देण्यात आला होता. मात्र तो छापण्यात आलेला नाही. काही मंडळाचा विरोध होता म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो लावण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. कोणत्या मंडळाने विरोध केला याची माहिती त्या देत नाहीत. यातून त्यांची मानसिकता समोर येते आहे. हे पालिकेचे षडयंत्र आहे. यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष जाहीर करावे, अन्यथा आम्ही २० तारखेपासून उपोषणाला बसू, असा इशारा मंडळाने दिला. ट्रस्टने सादर केलेल्या ध्वनिफितीवर महापौर मुक्ता टिळक यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा १२६व्या वर्षात पदार्पण करत असताना पुणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करत आहे. महापालिकेच्या या कार्यक्रमावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आक्षेप घेतला. या प्रकाराविरोधात मंडळाकडून यापूर्वीही अनेकदा आंदोलन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हावर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले. बोधचिन्हाचा आकार मर्यादित असल्याने त्यावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरले नसल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते.