यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा १२६व्या वर्षात पदार्पण करीत असताना पुणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करीत असल्याचा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आला आहे. या प्रकाराविरोध मंडळाकडून आज मंडई चौकात कार्यकर्त्यांनी काळया फिती बांधून आंदोलन छेडले, यावेळी त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणाऱ्या कार्यक्रमात सत्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका जाहिर केली आहे.

याविषयी मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे म्हणाले, “सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२६वे वर्ष असल्याच्या पुराव्यांसहित महापालिका ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तरीही याची दखल न घेता महापालिका चुकीचा कार्यक्रम आखत असून ही बाब निषेधार्ह असून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो”. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सव सुरु केला जाणार आहे. याबाबत आज कार्यक्रम ठिकाणी भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले आहे. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले आहे. बोधचिन्हाचा आकार मर्यादित असल्याने त्यावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरले नसल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, अशी मागणी श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्यावतीने मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे.