News Flash

उद्योगनगरीत लोकप्रतिनिधींचे बेसुमार नामफलक

पिंपरी-चिंचवड शहरात लोकप्रतिनिधींच्या नामफलकांचा सुळसुळाट झाला आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाची माहिती असावी म्हणून लावण्यात येणाऱ्या फलकांचा शहरभरात सुळसुळाट झाला आहे.

पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; उद्या सभेत नवे नामफलक धोरण

पिंपरी-चिंचवड शहरात लोकप्रतिनिधींच्या नामफलकांचा सुळसुळाट झाला आहे. राजकीय वर्तुळातील माननीयांचा ‘मान’ राखण्यासाठी पालिकेने जागोजागी फलक लावले असताना, अनेकांनी स्वत:हून मोक्याच्या ठिकाणी फलकबाजी करत मिरवण्याची हौस भागवून घेतली आहे. नगरसेवक नसणारे ‘स्वीकृत’ कार्यकर्ते नगरसेवक म्हणून झळकत आहेत. ‘माजी’ लोकप्रतिनिधींना फलक हवेच आहेत. अशा प्रकारच्या फलकबाजीमुळे शहरातील विद्रुपीकरणाला हातभारच लागला आहे. या संदर्भातील कारवाईत कुचराई करणाऱ्या पालिकेला उशिरा शहाणपण सुचले आहे. त्यामुळेच नवे नामफलक धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, तेही अर्धवट असल्यासारखे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकांमध्ये हिरव्या रंगाचे जे फलक दिसून येतात ते नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक, प्रभाग स्वीकृत सदस्य, शिक्षण मंडळ सदस्य, विविध समित्यांचे सदस्य आदींचे निवासस्थान आणि कार्यालय कुठे आहे, याची माहिती देणारे फलक आहेत. अनेक ठिकाणी फलकांची गर्दी झालेली दिसून येते. काही ठिकाणी नगरसेवक नसणाऱ्यांनी आपणच नगरसेवक असल्याप्रमाणे फलक लावले आहेत.

विशेषत ‘स्वीकृत’ असणारे सदस्य आपल्या नावापुढे ‘स्वीकृत’ असा शब्द न लावता थेट नगरसेवक असा शब्दप्रयोग वापरत आहेत. याविषयी अनेक नगरसेवकांनी आक्षेप नोंदवले आहेत. काहींनी आपल्या कार्यालयाचा पत्ता दाखवणारे हिरवे फलक लावले आहेत. अशा प्रकारच्या फलकबाजीची सातत्याने चर्चा झाली, मात्र राजकीय दबावामुळे पालिकेने कधीही कारवाईचा बडगा उचलला नाही. अतिरेक झाल्याने अखेर या बाबतचे विशिष्ट धोरण असावे, यादृष्टीने पालिकेने पावले टाकली. स्थायी समितीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. आता अंतिम मान्यतेसाठी बुधवारी (२० डिसेंबर) होणाऱ्या सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रस्तावात फलकबाजीला आळा बसेल असे काहीच नाही, मात्र फलक कशा प्रकारचे असावेत, याचेच मार्गदर्शन केल्याचे दिसून येते.

नामफलक धोरण काय आहे?

फलक दर्शनी भागात असावेत, वाहतुकीला अडथळा होणार नाही, दृश्यता बाधित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी पदाधिकारी यांच्या नावाचे फलक रस्त्याच्या एका बाजूला असावेत, फलकाची उंची जास्त असू नये. हिरव्या रंगाचा फलक असावा व त्यातील मजकूर मराठीत व पांढऱ्या अक्षरात असावा, फलकांवर असलेल्या नावांचे पत्ते नगरसचिव कार्यालयाने स्थापत्य मुख्य कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे. नावाचे फलक हे विद्यमान नगरसेवक तसेच लगतच्या निवडणुकीतील माजी नगरसेवकांचे फलक असतील. लोकप्रतिनिधींच्या पदाचा स्पष्ट उल्लेख असावा. माजी अथवा स्वीकृत असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे. केवळ ‘मा.’ अथवा ‘स्वी’ असा उल्लेख असू नये. याव्यतिरिक्त असणारे फलक बेकायदेशीर समजून काढून टाकण्यात यावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:42 am

Web Title: public representative name board in pimpri chinchwad city
Next Stories
1 मार्केट यार्डात हनुमान फळाची आवक
2 ‘ऊस वाहतूक खर्चाची कपात अंतरानुसार करा’
3 शहरबात पुणे : पुणेकरांचे सायकल प्रेम, लोकप्रतिनिधींची नौटंकी!
Just Now!
X