News Flash

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच अ‍ॅपवर येणार

स्वारगेट येथील बहुउद्देशीय वाहतूक केंद्राच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण केले जाणार आहे.

पुण्यात शनिवारी आयोजित कार्यक्रमात विजेवर चालणाऱ्या पीएमपीच्या बसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

स्वारगेट येथील बहुउद्देशीय वाहतूक केंद्राच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण केले जाणार आहे. स्वारगेट येथे दररोज विविध सहा लाख वाहने येतात. या सर्वाना या प्रकल्पात सामावून घेतले जाईल. पुणे शहरातील यापुढील टप्पा स्मार्ट वाहतुकीचा असेल. त्यामध्ये संवेदकाच्या (सेन्सर) आधारे पीएमपी गाडय़ांची सुलभता मिळणार आहे. बसथांब्यावर पीएमपी कधी पोहोचेल, गाडीत जागा आहे किंवा कसे, हेही समजणार आहे. असे झाल्यास नागरिक खासगी वाहने वापरणार नाहीत. त्यासाठी भविष्यात शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एका अ‍ॅप्लिकेशनवर आणली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आयोजित स्वारगेट येथील बहुउद्देशीय स्थानकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. पुणे मेट्रो आणि फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) यांच्यात प्रकल्प कर्ज, तांत्रिक सल्ला विषयक करारनाम्यावर या वेळी स्वाक्षरी करण्यात आली. तसेच, विजेवर चालणाऱ्या पीएमपी गाडय़ांचे लोकार्पण करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, सार्वजनिक वाहतूक एकाच अ‍ॅपवर आल्यास त्या माध्यमातून शहराच्या कोणत्याही भागातून सार्वजनिक वाहनांची उपलब्धता दिसेल. पीएमपी, मेट्रो यांच्या वेळेची सविस्तर माहिती मिळेल.

तसेच या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच तिकिटावर आणल्या जातील. एकच तिकीट मेट्रो, पीएमपी आणि इतर सार्वजनिक वाहनांमध्ये चालेल. अशाप्रकारे पुण्यातील वाहतूककोंडी आपण संपवू शकू. सर्व सार्वजनिक व्यवस्थांचे एकत्रीकरण झाल्यास पुणे सर्वोत्तम शहर होईल.

महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, अनिल शिरोळे, दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह सर्व आमदार, महापालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्यदूत सोनिया बारब्री, एएफडीचे भारत आणि बांगलादेश यांचे विभागीय संचालक निकोलस फोरनेज या वेळी उपस्थित होते.

‘पुढील वर्षी आपण मेट्रोमधून जाऊ’

पुणेकर आधीपासूनच स्मार्ट होते आणि आहेत. मात्र, शहरही स्मार्ट होण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे आणि पुण्याच्या परिघावरचा परिसर हा देशातील सर्वाधिक विस्तारणारा भाग आहे. त्यामुळे पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. काही प्रकल्प लवकरच, तर काही आगामी काळात पूर्ण होतील. आपण सर्व पुढील वर्षी मेट्रोमधून नक्की प्रवास  करू, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी सांगितले.

वर्तुळाकार मार्गाच्या कामाचा आदेश

पुणे शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उच्च क्षमता जलदगती वर्तुळाकार मार्गाचे काम जूनपर्यंत सुरू करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना दिले असल्याची माहिती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 1:09 am

Web Title: public transport system of pune will come to the one app
Next Stories
1 थंडीचा राज्यभर कहर!
2 शिक्षक भरतीची जाहिरात न निघाल्यास शिक्षकांचा आत्मदहन करण्याचा इशारा
3 पुणे शहराची ओळख प्रदूषित म्हणून होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Just Now!
X