News Flash

हिग्ज बोसॉनच्या संपूर्ण आकलनासाठी आणखी प्रयोगांची गरज-डॉ. कोतवाल

कोलायडरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला थोरियमपासून अणुऊर्जा बनवणे शक्य होईल.

सर्नच्या लार्ज हैड्रॉन कोलायडर या महाकाय यंत्राच्या मदतीने शोधण्यात आलेल्या हिग्ज बोसॉन कणाचे अजून संपूर्ण आकलन झालेले नाही. त्यात काही बले(फोर्सेस) काम करीत असतील व त्यांचा शोध घेण्यात आगामी प्रयोगांमध्ये यश आले तर ऊर्जेचे मोठे भांडार खुले होईल, असे सर्न प्रकल्पातील वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. कोतवाल यांचा परिचय करून देणारे ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे पुस्तक त्यांच्या मातोश्री माणिक कोतवाल यांनी लिहिले असून त्याचा प्रकाशन समारंभ सोमवारी (२९ फेब्रुवारी)  होत आहे. त्यानिमित्त बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी, कोथरूड येथे सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या वेळी वैज्ञानिक डॉ. गोविंद स्वरूप व माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत. डॉ. कोतवाल यांची मुलाखत निवेदक सुधीर गाडगीळ घेणार आहेत.
या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोतवाल यांनी सांगितले की, हिग्ज बोसॉनबाबत अजून अनेक बाबी अनुत्तरित आहेत, त्यांचा शोध घेतला तर आज अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य होणार आहेत. विश्वातील कृष्णद्रव्याचा शोध घेण्यासाठी नवे कोलायडर यंत्र तयार करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी ३०-४० अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे पण या वेळी तंत्रज्ञान किफायतशीर करण्याचा प्रयत्न राहील. या प्रकल्पात भारताचाही सहभाग असेल व त्यातून या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे मिळणार आहेत. चीन, अमेरिका व युरोपीय समुदायाचे नव्या कोलायडर यंत्राच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव आहेत. नवीन यंत्रात माहिती व ऊर्जेचे प्रमाण वीस पट अधिक असणार आहे. जेवढी जास्त माहिती उपलब्ध होईल तसे हिग्ज बोसॉनच्या अंतरंगात डोकावणे सोपे जाणार आहे.  त्यातून नव्या बलांचा उलगडा झाला तर सौरमालेबाहेरील ग्रहांवर स्वारी करण्याइतकी ऊर्जा क्षमता असलेले इंधन उपलब्ध होऊ शकते, कण भौतिकीच्या क्षेत्रात आता भारतातील आयसरसारख्या संस्थांमध्येही चांगले संशोधक तयार झाले आहेत व त्यात भारत मागे नाही. सर्नसारख्या प्रकल्पांमधून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लागण्याला मदत होत असते. न्यूट्रिनो संशोधनाच्या अमेरिकी प्रकल्पातही भारताला सहभागी केले जाणार आहे, असे सूतोवाच त्यांनी केले.
गुरूत्वीय लहरींच्या शोधाबाबत ते म्हणाले की, गुरूत्वीय लहरींचा शोध लायगो उपकरणामुळे लागला आहे. अमेरिकेत अशी दोन उपकरणे असून तिसरे उपकरण भारतात बसवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या लायगो उपकरणातून गुरूत्वीय लहरींचे जास्त स्त्रोत शोधता येतील. शिवाय, त्या उपकरणाची संवेदनशीलता दहा पट वाढवली तर सगळे विश्वच या उपकरणाच्या निरीक्षण टप्प्यात आणता येईल.
कोलायडरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला थोरियमपासून अणुऊर्जा बनवणे शक्य होईल. अमेरिकेत थोरियमपासून अणुशक्तीसाठी उपयुक्त इंधन तयार करण्याचे तंत्रज्ञान आहे. भारतात थोरियमची उपलब्धता भरपूर आहे, पण त्यापासून अणुउऊर्जा बनवणे सध्या अवघड आहे. ते कालांतराने शक्य होईल, त्यामुळे ऊर्जा निर्मितीत यामुळे प्रगती करता येईल. परदेशातून आयात युरेनियमवरचे अवलंबित्व कमी होईल. अणुऊर्जा प्रदूषणमुक्त असून अणुकचरा जाळण्यासाठीही विकिरण तंत्राचा वापर करता येतो; असे अनेक फायदे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 3:22 am

Web Title: publication of book by manik kotwal
Next Stories
1 पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणाला तुटपुंजाच निधी
2 पुण्यातील हनुमान टेकडीवर तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, एकाला अटक
3 BLOG : थ्री चियर्स फॉर गहुंजे!
Just Now!
X