News Flash

संगीत शिक्षण अर्थपूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक – स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे

‘मॅस्ट्रोज स्पीक’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांच्या हस्ते झाले.

कलाविष्कार आणि शास्त्र हातात हात घालून चालतील तर संगीत शिक्षण खूप सुलभ आणि अर्थपूर्ण होईल. या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेतर्फे संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे विचार मांडणाऱ्या ‘मॅस्ट्रोज स्पीक’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांच्या हस्ते झाले. हा ग्रंथ डॉ. प्रभा अत्रे यांना अर्पण करण्यात आला. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, ग्रंथाच्या संपादिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव-मारुलकर, सहसंपादिका शोभना गदो या वेळी व्यासपीठावर होत्या. पं. जसराज आणि डॉ. अत्रे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अत्रे म्हणाल्या,‘कलाकार हे संगीताची निर्मिती करतात. शास्त्रकार त्यानंतर या कलाविष्काराला शास्त्राची चौकट देतात. शास्त्र हे नेहमी कलाविष्काराच्या मागून चालत असतं. कलाविष्कार बदलला की शास्त्रालाही बदलावं लागतं. भीमसेनजी, जसराजजी यांच्यासारखे समर्थ कलाकार या शास्त्राच्या चौकटीतून बाहेर पडून शास्त्राला एक नवीन परिमाण देतात. कलाकार मूळ स्रोतापासून दूर जाणार नाही हे शास्त्रकारांनी पाहायचं असतं. तर, कलाविष्काराच्या प्रवाहाला साचलेपण येणार नाही हे कलाकारांनी पाहायचं असतं. भारतातील कलाकार कलानिर्मितीबद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. संगीतासारख्या अमूर्त संकल्पनांना शब्दरूप देणं हे कठीण काम आहे. संगीताची सूर-लयाची भाषा रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला समजणाऱ्या भाषेतूनच संवाद साधायला हवा. संगीत समजून घेत गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा ग्रंथांची गरज आहे.’
संगीतातील निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त असून हा ग्रंथ जागतिक भाषेमध्ये जात असल्याचे संगोराम यांनी सांगितले. सिंबायोसिस संस्थेमध्ये संगीताचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करीत मुजुमदार यांनी गानवर्धन संस्थेस २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. संगीताच्या सेवेने माझे आयुष्य पुलकित केल्याची भावना धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. अलका देव-मारुलकर आणि शोभना गदो यांनी ग्रंथाच्या अंतरंगाची माहिती देताना डॉ. श्रीरंग संगोराम यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्रामध्ये गुणिजनांचा गौरव
जात, धर्म, प्रांत याचा विचार न करता महाराष्ट्रामध्ये कलाकाराला मान्यता मिळते आणि गुणिजनांचा गौरव केला जातो. एवढेच नव्हे, तर एखाद्या कलाकाराला जावईदेखील करून घेतले जाते, अशी भावना पं. जसराज यांनी व्यक्त केली. डॉ. प्रभा अत्रे आणि धर्माधिकारी यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:22 am

Web Title: publication of masteros speak by pandit jasraj
Next Stories
1 अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरुज्जीवन
2 ‘क्रोशे’ची अनोखी दिनदर्शिका
3 पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्दचा पिंपरी पालिकेला २५ कोटींचा फटका
Just Now!
X