विशेष मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते उत्तुंग यश संपादन करू शकतात हे गौरी गाडगीळ हिने सिद्ध केले आहे. गौरीची ही कामगिरी विशेष मुले आणि त्यांच्या पालकांसाठी आदर्श आहे. त्यामुळे पालकांनी विशेष मुलांना घरामध्ये न ठेवता त्यांना समाजासमोर आणले पाहिजे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘यलो’ चित्रपटामध्ये भूमिका केलेली बालकलाकार आणि जलतरणपटू गौरी गाडगीळ वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या जीवनावरील ‘राजहंस’ या पुस्तकाचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये, ‘यलो’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये, महापालिका शिक्षण मंडळ सदस्य शिरीष फडतरे, पुस्तकाच्या लेखिका स्नेहा गाडगीळ, शेखर गाडगीळ या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले,‘‘ अनेक पालक संकोची वृत्तीतून त्यांच्या अपंग, दृष्टिहीन मुलांना समाजामध्ये आणत नाहीत. अशा विशेष मुलांचे संगोपन करणे अवघड असते. अशी मुले सर्वसाधारण मुलांसमवेत वावरल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येऊ शकतो. सर्वसाधारण मुलांपेक्षाही विशेष मुलांना चांगली जाण असते. गौरीच्या पालकांनी तिला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे तिला आत्मविश्वास आला. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये गौरीने प्रावीण्य संपादन केले आहे. हे यश विशेष मुलांप्रमाणेच सर्वसाधारण मुलांसाठीदेखील प्रेरणादायी आहे.’’
‘यलो’ चित्रपटाच्या निर्मिती प्रवासात गौरीकडून खूप काही शिकायला मिळाले. आम्हा सर्वाना गौरी या ‘राजहंसा’बरोबर काम करण्याची संधी मिळाली हेच आमच्यासाठी विशेष आहे, असे महेश लिमये यांनी सांगितले. उत्तरार्धात उपेंद्र लिमये आणि मुक्ता भिडे यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले.