आमदार-खासदार होण्यासाठी कोटय़वधी रुपये लागतात अशा लोकशाहीमध्ये साहित्यिक, कलावंत आणि सामान्य माणसाचा वरिष्ठ सभागृहामध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी सोमवारी राजकीय वास्तवावर प्रकाश टाकला.
‘ग्रंथाली’तर्फे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर यांच्या ‘शब्द’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी महानोर बोलत होते. निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक टी. सी. वानखेडे, ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके आणि चंद्रशेखर दैठणकर या प्रसंगी उपस्थित होते.
राजदंड पळविणारे, मिरपूड टाकणारे आणि चप्पल फेकून मारणारे कसले राजकारणी याकडे लक्ष वेधून महानोर म्हणाले, आपल्याकडे आमदाराला संरक्षण आहे. पण, आमदारांना हटकणाऱ्या पोलिसाला दंडुके मारून घरी पाठविणारी व्यवस्था आहे. सध्याच्या राजकारणाची कक्षा बदलली आहे. पोलिसांना गुंड आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना हात लावता येत नाही. रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते. आपल्या मुख्यमंत्र्यांना पाचशे ते हजार हात आहेत. शेखर यांनी या पुस्तकातून सत्यघटनांचे एका सीमारेषेमध्ये लेखन केले आहे. या लेखनाने मला अस्वस्थ केले.
वळसे-पाटील म्हणाले, प्रत्येक गुन्ह्य़ाची उकल व्हावी अशी सामान्य माणसाची इच्छा असते. पण, हा मार्ग किती खडतर आहे याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर येते. आपल्याकडील माहिती पोलिसांना द्यावी असे सामान्य माणसाला वाटले तर अनेक गुन्ह्य़ांची उकल होऊ शकेल. एवढे करूनही तांत्रिक त्रुटीमुळे आरोपीला शिक्षा झाली नाही तर, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडू लागण्याची शक्यता वाढते. पोलिसांनी जनतेचे मित्र असले पाहिजे. पण, इतकी जवळीक असू नये की त्यांना पोलिसांना धाक वाटणार नाही. या वेळी वानखेडे, शेखर, सोळुंके, हांडे यांनी मनोगत व्यक्त केले.