घुमान येथील संमेलनावर आमचा बहिष्कार असल्याची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रकाशकांनी अखेर साहित्य महामंडळापुढे लोटांगण घातले. चर्चेचे दरवाजे बंद झाले असल्याची भूमिका घेणाऱ्या प्रकाशकांनी बंद खोलीमध्ये चर्चा करून संमेलनात सहभागी होण्याबाबत प्रकाशकांवर असलेला बहिष्कार मागे घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले.
मराठी प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी आणि साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये सोमवारी संयुक्त बैठक झाली. मध्यंतरीच्या काळात दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या मतभेदाच्या मुद्दय़ांना पूर्णविराम मिळण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्याध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह अनिल कुलकर्णी, कोशाध्यक्ष अरविंद पाटकर आणि ग्रंथविक्रेते रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
प्रकाशक परिषदेने त्यांच्या मागण्यांचे एक पत्र महामंडळाला दिले आहे. महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक २८ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे होणार असून या बैठकीमध्ये हे पत्र ठेवण्यात येईल. महामंडळ सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ हीच आमची भूमिका आहे. मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचार-प्रसार या एकाच उद्दिष्टाने काम करणाऱ्या या दोन संस्थांमध्ये सलोख्याचे वातावरण तयार होऊन वादास पूर्णविराम मिळाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अरुण जाखडे म्हणाले,की संमेलन मराठी मुलखात व्हावे ही आमची प्रमुख मागणी होती. घुमान येथे मराठी माणसे नसल्याने तेथे पुस्तकांची विक्री होणार नसल्याने आम्ही संमेलनाला विरोध केला. प्रकाशकांविषयी अनुदार उद्गार काढले गेले. मात्र, कोणती गोष्ट किती ताणायची हे ठरविले पाहिजे. या उद्देशातून वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून या प्रश्नामध्ये सुवर्णमध्य काढला आहे. साहित्य महामंडळ पुण्यामध्ये असताना अपशकुन करावा असे वाटत नाही. संमेलनामध्ये प्रकाशकांनी सहभागी व्हायचे की नाही याबाबतचा निर्णय आता साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर होणार आहे. मात्र, जे प्रकाशक संमेलनात सहभागी होणार आहेत त्यांच्याशी संबंध न ठेवण्याबाबतचा निर्णय मराठी प्रकाशक परिषद मागे घेत आहे.

मराठी प्रकाशक परिषदेने साहित्य
महामंडळाला दिलेल्या पत्रातील मुद्दे :
– साहित्य संमेलन हे मराठी मुलखात व्हावे.
– जेथे संमेलन होणार तेथील संयोजक स्थानिक असावेत.
– संमेलनामध्ये प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या गैरसोयी होऊ नयेत यासाठी आमच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली ग्रंथप्रदर्शन समिती नियुक्त करावी.