जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना एका व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कुमार उपेंद्र बीरबहादुर सिंग असे या व्यक्तीचे नाव असून उपेंद्र याला मानसिक आजार असल्याचे समजते.

गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील शिवाजी चौक येथे शुक्रवारी सामूदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण केली जात असताना कुमार उपेंद्र सिंग याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी उपेंद्र सिंगला लगेच ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाली. अखेर पोलिसांनी या जमावाला तिथून हुसकावले. सध्या शहरात शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कुमार उपेंद्र सिंह हा रेल्वेत कर्मचारी आहे. त्याला मानसिक आजाराने ग्रासले असून तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणी गाणे, विनोद सांगणे, प्रवाशांशी जोरात बोलणे असे वर्तन करतो, असे समजते. या घटनेची दखल रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली असून त्याला पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.