शहरात करोनाचा संसर्ग कायम आहे. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना मुखपट्टी परिधान करणे बंधनकारक केले असले, तरी अनेक जण मुखपट्टी परिधान करण्याच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे पोलिसांकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी मुखपट्टी परिधान न करणाऱ्या २ लाख ८१ हजार नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल १३ कोटी ६९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

करोनाच्या संसर्गात मुखपट्टी परिधान न करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टी परिधान करणे बंधनकारक आहे. अनेक जण मुखपट्टी फक्त नावाला परिधान करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाकाखाली घसरणाऱ्या मुखपट्टीमुळे संसर्ग होऊ शकतो, याची जाणीव अनेकांना नाही. पुणे शहरात वेगवेगळ्या भागात दररोज पोलिसांकडून मुखपट्टी परिधान न करणाऱ्या

नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना अंतर पाळावे, मुखपट्टी परिधान करावी, जंतुनाशकांचा वापर करावा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. मध्यंतरी शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. त्या वेळी अनेक जण ‘करोना गेला’ अशा भ्रमात सार्वजनिक ठिकाणी वावरत होते.

कारवाईला विरोध आणि बाचाबाची

पोलिसांकडून दररोज सरासरी तीन हजार नागरिकांवर मुखपट्टी परिधान न केल्याप्रक रणी कारवाई करण्यात येते. चौकाचौकात सिग्नलवर थांबलेले पोलीस वाहनचालकांची तपासणी करतात तसेच सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असते. दंडात्मक कारवाई करताना नागरिकांकडून पोलिसांना विरोध होतो. नागरिकांकडून वाद घालण्याचे प्रकार घडतात. काही जणांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात येतात.

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर न केल्याने करोना संसर्गाचा धोका जास्त असतो. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

– श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा