पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा…आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन होऊन काही तास उलटले आहेत. मंगळवारी सकाळी एका भाविकाने १५१ किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी अर्पण केला आहे.

मंगळवारी सकाळी सहा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळाच्या उत्सव मंडपासमोर ॠषिपंचमीनिमित्त २५ हजार हून अधिक महिलांचे सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठणचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर बाप्पाच्या चरणी एका भाविकांने १५१ किलोचा मोदक अर्पण केला आहे. हा मोदक पाहण्यासाठी आणि त्याचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले आहे. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.

वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती महामोदक अर्पण केला. काका हलवाईचे महेंद्र गाडवे व युवराज गाडवे यांनी हा महामोदक साकारला आहे. काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्क या मोदकाला केले आहे. सलग ८ तासांच्या मेहनतीनंतर १५ कारागिरांच्या मदतीने हा मोदक तयार करण्यात आला.

‘गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया’ या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात घराघरांत सोमवारी गणरायाचे आगमन झाले. ओडिशा येथील श्री गणेश सूर्यमंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना शिर्डी कोकमठाण येथील विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाली. श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये विविध पथके सहभागी झाली होती.