पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं, ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.

पांडुरंग रायकर यांनी पत्रकारितेची सुरुवात एबीपी माझा (मुंबई), टीव्ही ९ (अ.नगर) आणि त्यानंतर पुण्यात कामास सुरुवात केली. मागील आठवड्यात त्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोना चाचणी केल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सीईओपी मैदानावरील कोविड केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज पहाटेच्या सुमारास उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील पांडुरंग रायकर यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विट करीत ते म्हणाले, “नगर जिल्ह्याचे सुपुत्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याच्या बातमीने सुन्न झालोय. त्याच्यासाठी सर्व मित्र झटत होते, पुण्यात करोनाचं संकट वाढत असताना हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत, खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली खरी पण… माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही.”