News Flash

पुणे – कमिन्स कंपनीत ५० कामगार आढळले अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण!

कंपनी ३ दिवस बंद ठेवण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश; कंपनी परिसर करोना हॉस्पॉट ठरवण्यात आला.

संग्रहीत फोटो

पुण्यातील कोथरूड भागातील कमिन्स कंपनीमध्ये ५० कामगार अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कंपनी तीन दिवस बंद करण्याचे आदेश, महापालिका प्रशासना मार्फत देण्यात आले आहे.

या संदर्भात पुणे मनपाकडून कमिन्स कंपनीला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”ज्याअर्थी सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र व पुणे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, पुणे मनपा आयुक्त यांच्यामार्फत वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार उत्पादन क्षेत्रात काम करण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र शासन यांनी विहीत केलेली आहे. तसेच, पुणे मनपा आयुक्तांनी देखील वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. त्याअर्थी सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. तथापि आपल्या कंपनीत या निर्देशांचे योग्यरितीने व परिपरूर्णपणे पालन होत नसल्याने, कामगारांमध्ये करोनाची लागण झाल्याचे आढळून आलेले आहे. त्या अनुषंगाने सदर कंपनीची पाहणी करून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार आपण सादर केलेल्या अहवाालात मागील दोन महिन्यात २४० कर्मचारी(एकूण कामगारांच्या २० टक्के) करोनाबाधित झाल्याचे व तसेच, तीन कामगारांचा कोविडमुळे म़ृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, ५० कामगार अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण असल्याचे अहवालावरून दिसून आले आहे. याशिवाय आपल्या कंपनीत जेवणासाठी उपलब्ध असणारी व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी सर्व कामगार एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी त्या ठिकाणी करोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.”

तसेच, ‘ज्या अर्थी आपल्या कंपनीतील कर्मचारी मोठ्याप्रमाणात करोनाबाधित होत आहेत. त्या अर्थी आपले कंपनी क्षेत्र करोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसेच याबाबत महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला खालील प्रणाणे आदेश दिले जात आहेत.

१. आपले कंपनी कामकाज २० मे ते २३ मे पर्यंत बंद ठेवण्यात यावेत.
२. सर्व कामगारांचे रॅपीड अॅन्टीजन/ आरटीपीसीआर कोविड चाचणी क्षेत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करायची असून, त्याबाबतचा अहवाल २२ मे पर्यंत त्यांच्या मार्फत सादर करावा.
३. सर्व कामगारांची पुढील आदेशापर्यंत १० दिवसांमध्ये कोविडबाबत फेर चाचणी करण्यात यावी.
४. सर्व कामगारांना फेसशील्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे.
५. कंपनीतील कॅन्टीनमध्ये कामगारांना बसुन खाण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे.
६. कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
७. कंपनीतील परिसर व यंत्र सामग्रीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून गांभीर्यपूर्वक पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणविरोधात उपरोक्त संदर्भान्वये व प्रचलित अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल,याची गांभीर्याने नोंद घ्यावे. असे पत्रात सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 7:37 pm

Web Title: pune 50 workers found corona positive in cummins company msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक,” गिरीश बापटांचं वक्तव्य
2 रस्ते काँक्रिटीकरण झाडांच्या मुळांवर
3 केशकर्तनालय व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले; चालक, कारागिरांचे हाल
Just Now!
X