अगोदर चायनीज रेस्टॉरंट सुरू करून रेकी केली आणि नंतर सराफा दुकानावर चौघांनी डल्ला मारल्याची घटना पुण्यात घडली होती. गुन्ह्यातील आरोपी असलेल्या या चार नेपाळी तरूणांनी सराफा दुकानाच्या शेजारीच चायनीज सेंटर सुरू केले होते. नंतर, या आरोपींनी आपल्या चायनीज सेंटरमधूनच थेट सराफा दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून दागिने लंपास केले.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने नेपाळी आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात, पावणे दोन किलो चांदी आणि १ तोळा सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

जगत बम शाही, गणेश विष्णू शाही, खगेंद्र दोदि कामी, प्रेम रामसिंग टमाटा, कारचालक रईस कादर खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शंकर चंद्र उर्फ कांचा लामा, अर्जुन उर्फ ओम रावल, बादल लामा हे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. हे सर्व जण फेसबुकच्या मेसेंजरचा वापर करून मेसेज आणि व्हिडिओ कॉल करून संपर्कात राहायचे. या घटनेचा मुख्य आरोपी हा गणेश विष्णू शाही असून त्याच्यावर घरफोडी आणि दरोड्याचे १२ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान फोडून पावणे दोन किलो चांदी आणि १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या यासह इतर साहित्य चोरुन नेल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पुण्याच्या बावधन परिसरातील हुतात्मा चौकात या चार आरोपींनी चायनीजचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून दुकान भाड्याने घेतलं होतं. आरोपींनी सुरू केलेल्या चायनीज रेस्टॉरंटचं फ्लॉवर रेस्टॉरंट असं होतं. त्याच्या शेजारीच जगदंबा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. चायनीज सेंटर या सराफा दुकानाची सामाईक भिंत होती. याचाच फायदा घेत एका रात्रीत भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश करत, पावणे दोन किलो चांदीचे दागिने आणि दहा ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या आरोपींनी लंपास केल्या होत्या.

घटनेच्या महिनाभरानंतर या आरोपींना गुन्हे शाखा युनिट चार ने बेड्या ठोकल्यात आहे. यात, बावधन परिसरातील वॉचमन सहभागी असल्याचंही समोर आलं असून त्याला ठाण्यातील अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता, इतर चार जणांची नाव समोर आली. त्यांना देखील ठाण्याच्या विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.