पुण्यात पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात आईसह तीन मुलींचा मृत्यू झाला. तर, महिलेचा पती सुदैवाने या अपघातात बचावला असून ते जखमी आहेत.

अल्पना विठ्ठल भिकुले (वय ४५), प्राजक्ता विठ्ठल भिकुले(वय २१), प्रणिता विठ्ठल भिकुले(वय १७), वैदेही विठ्ठल भिकुले(वय ८, सर्व रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अल्पना यांचे पती विठ्ठल (वय ४६) हे बचावले असून ते जखमी झाले आहेत. विठ्ठल कार चालवत होते. भिकुले कुटुंबीय मूळचे वेल्हा तालुक्यातील आहेत. विठ्ठल, त्यांची पत्नी आणि तीन मुली गावी गेले होते. शुक्रवारी (२ एप्रिल) सर्वजण गावावरून पुण्याकडे परतत होते. उरण फाट्याजवळ विठ्ठल यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडली.

या भाागातील ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना दिली. त्यानंतर वेल्हे पोलीस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोटारीतील चौघांचा शोध घेण्यात आला. अल्पना, त्यांचे पती आणि तीन मुलींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अल्पना, प्राजक्ता, प्रणिता, वैदेही यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने  वेल्हे तालुक्यात शोककळा पसरली आहे.