पुणे शहरातील महात्मा फुले मंडई येथील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा-गजानन यांच्या मूर्तींवरील सुमारे २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दानपेटीमधील काही रक्कम चोरीला गेल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या खळबळजनक घटनेतील आरोपी अखेर जेरबंद झाले असून मुंबईतील दागिना बाजारातून मुंबई लोहमार्ग पोलिसांना त्यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अजय महावीर भूतकर (वय १९, रा. हिंगोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरातील मंडई येथील शारदा गजानन मंदिराच्या मुख्य मंडपात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अजय भूतकर याने तोंडाला मास्क लावून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने बाप्पाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे हार, एक मंगळसूत्र, कंठी असे मिळून अंदाजे २५ तोळे सोने आणि दानपेटी मधील काही रक्कम चोरून पसार झाला.

मात्र, या घटनेदरम्यान आरोपीच्या चेहर्‍यावरील मास्क खाली आल्याने, आरोपीचा चेहरा दिसून आला. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अनेक मार्गाने तपास सुरू असताना, काल मुंबईतील दागिना बाजारात एका व्यक्तीकडे हे सोन्याचे दागिने असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुंबई लोहमार्ग पोलिसांनी आरोपीकडून सव्वा पाच लाख रुपये किमतीची दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असू आरोपीला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.